कोल्हापुर: ऊस दर आंदोलनाचा भडका! मिणचे-तासगाव मार्गावर चालकाला खाली ओढत उसाचा ट्रॅक्टर पेटवला, १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर: जिल्ह्यात ऊस दरावरून पेटलेला संघर्ष आता अधिकच आक्रमक रूप धारण करू लागला आहे. चालू गळीत हंगामात उसाची पहिली उचल आणि दर निश्चित करण्यावरून शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यातील वाद टोकाला गेला असताना, कोल्हापूरमधील पेठ वडगाव परिसराजवळ एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. मिणचे-तासगाव मार्गावर 'सरकार मळा' परिसरात ऊस वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर काही आंदोलकांनी अडवला आणि चालकाला जबरदस्तीने खाली ओढत तो ट्रॅक्टर पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. या हिंसक प्रकारामुळे कोल्हापूरच्या राजकीय व ग्रामीण भागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, खोची येथून दोन ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या साहाय्याने बावडा येथील राजाराम साखर कारखान्याकडे उसाची वाहतूक सुरू होती. हे वाहन मिणचे-तासगाव मार्गावरील सरकार मळा परिसरात आले असता, आधीपासूनच तिथे दबा धरून बसलेल्या १० ते १५ अज्ञात तरुणांनी व आंदोलकांनी ट्रॅक्टर अडवला. "ऊस वाहतूक करायची नाही हे माहीत असतानाही कसा नेतोस," असे म्हणत त्यांनी चालकाला जाब विचारत शिवीगाळ केली. यानंतर त्यांनी ट्रॅक्टरवर पेट्रोल ओतले आणि चालकाला जबरदस्तीने खाली ओढून बाजूला सारले. पाहता पाहता या ट्रॅक्टरला आग लावून देण्यात आली, ज्यामुळे ट्रॅक्टर जळून पूर्णपणे भस्मसात झाला.

या घटनेची माहिती मिळताच वडगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले; परंतु तोपर्यंत ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले होते. पोलिसांच्या गाड्यांचा आवाज ऐकताच अंधाराचा फायदा घेऊन संशयित तरुण घटनास्थळावरून पसार झाले. या ट्रॅक्टरवरील चालक अक्षय बबन गांगुर्डे हे मूळचे बीड जिल्ह्यातील आहेत. या प्रकरणी पेठ वडगाव पोलीस ठाण्यात १० ते १२ जणांविरोधात विविध कलमांन्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी कसून तपास सुरू आहे. ऊस दराच्या प्रश्नावर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामीण भागात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *