पुण्यात संतापजनक प्रकार! कॅल्शिअमच्या गोळीतून ब्लेडचे तुकडे खाऊ घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला ७ वर्षे सक्तमजुरी

पुणे:पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला कॅल्शिअमची गोळी असल्याचे भासवत कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे खाऊ घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नराधम पतीला न्यायालयाकडून कठोर शिक्षेचा दणका देण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांच्या न्यायालयाने आरोपी पतीला ७ वर्षांची सक्तमजुरी आणि ७० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. सोमनाथ साधू सपकाळ (वय ४५, रा. शिवणे, एनडीए रस्ता, पुणे) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोषी पतीचे नाव आहे.

नेमकी घटना काय होती? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ सपकाळ हा केशकर्तनाचे (न्हावी) काम करत असल्याने त्याच्याकडे रेझर ब्लेड सहज उपलब्ध होते. तो नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता. मात्र, घटनेच्या काही महिने आधी त्याने अचानक गोड बोलून पत्नीचा विश्वास संपादन केला. पत्नीचे पाय दुखत असल्यामुळे त्याने तिला कॅल्शिअमच्या गोळ्या देण्यास सुरुवात केली.

आरोपी पती कॅप्सूलमधील मूळ औषध बाहेर काढून त्या रिकाम्या कॅप्सूलमध्ये ब्लेडचे तुकडे वाकवून अत्यंत चलाखीने बसवत असे आणि ती धोकादायक गोळी आपल्या पत्नीला रोज खायला देत असे. ऑक्टोबर २०२३ मध्ये पत्नीच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर शौचावाटे ब्लेडचे तुकडे बाहेर पडल्याने एकच खळबळ उडाली. प्रकृती खालावल्याने ४ नोव्हेंबर २०२३ रोजी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वैद्यकीय तपासणीत धक्कादायक प्रकार उघडरुग्णालयात डॉक्टरांनी केलेल्या 'सीटी स्कॅन' आणि 'एंडोस्कोपी' दरम्यान पत्नीच्या आतड्यात ब्लेडचा तुकडा अडकल्याचे निष्पन्न झाले. ११ नोव्हेंबर २०२३ रोजी डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून तो ब्लेडचा तुकडा बाहेर काढला. हा प्रकार अत्यंत जीवघेणा होता, आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी साक्ष देताना स्पष्ट केले की, पोटात गेलेले ब्लेडचे तुकडे अत्यंत प्राणघातक असून यामुळे महिलेचा मृत्यूही ओढवू शकला असता. या प्रकरणी पीडित पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे नोव्हेंबर २०२३ मध्ये उत्तमनगर पोलीस ठाण्यात पतीविरोधात खुनाचा प्रयत्न करणे आणि पत्नीचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सुनावणीदरम्यान पत्नी आणि मुलगा फितूर या खटल्याचे कामकाज अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू असताना एक मोठा ट्विस्ट आला. खटल्याच्या सुनावणीदरम्यान खुद्द पीडित पत्नीने आणि त्यांच्या मुलाने न्यायालयात आपली साक्ष पूर्णपणे बदलली (फितूर झाले). हॉटेलमधील जेवणामamil पोट दुखल्याची व पतीविरोधातील सर्व आरोप नाकारत दोघांमधील वाद मिटल्याची नरमला लावणारी साक्ष त्यांनी दिली. आरोपी पतीने आपण कुटुंबाचा एकमेव कमावणारा असून शिक्षेमुळे कुटुंबाचे हाल होतील असा युक्तिवाद केला होता.

न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण आणि कायद्याचा दणकासरकारी पक्षाकडून काम पाहणाऱ्या वकिलांनी (सरकारी वकील लीना पाठक आणि मकरंद औरंगाबादकर) युक्तिवाद केला की, आरोपीच्या दबावाखाली येऊन पीडित पत्नीने साक्ष बदलली असली तरी वैद्यकीय पुरावे, सीटी स्कॅन रिपोर्ट्स, औषध विक्रेत्याची साक्ष (ज्याने आरोपीने गोळ्यांचे पाकीट नेल्याचे सांगितले) आणि पोलिसांना घराच्या दिवाणातून मिळालेले उर्वरित ब्लेडचे तुकडे व गोळ्यांचे पाकीट हे गुन्ह्याची सत्यता सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत.

न्यायालयाने खटल्याची गंभीर दखल घेत खुद्द न्यायालयात रेझर ब्लेड वाकवून कॅप्सूलमध्ये बसवता येते का, याची प्रात्यक्षिके (डिमॉस्ट्रेशन) तपासून पाहिला. आरोपी हा न्हावी असल्याने ब्लेड हाताळण्यात निपुण होता, यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. "केवळ साक्षीदार किंवा पीडित महिला फितूर झाली म्हणून संपूर्ण वैद्यकीय पुरावे व खटला बाद ठरवता येत नाही," असे नमूद करत न्यायालयाने वैद्यकीय पुराव्यांच्या आधारावर पती सोमनाथ सपकाळ याला भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३०७ (खूनाचा प्रयत्न) आणि ४९८-अ अंतर्गत दोषी ठरवत ७ वर्षे सक्तमजुरी व ७० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. या निकालामुळे पुणे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *