पुणे: गोपाळ गोडसे यांनी संघाची तुलना चोरांशी केल्यावर मला काही भाष्य करायचे नाही, सात्त्यकी सावरकर; राहुल गांधी मानहानी खटल्यात उलटतपासणी पूर्ण

पुणे: विशेष खासदार-आमदार (MP-MLA) न्यायालयाचे न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांच्या समोर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कथित बदनामीप्रकरणी फौजदारी खटल्याची सुनावणी अत्यंत वेगाने सुरू आहे. या बहुचर्चित खटल्यामध्ये आज फिर्यादी तथा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू (पंतू) सात्त्यकी सावरकर यांचा अत्यंत महत्त्वाचा आणि रंजक उलटतपास पार पडला. राहुल गांधी यांचे मुख्य वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी सात्त्यकी सावरकर यांच्याकडे सविस्तर उलटतपास घेतला.

सावरकरांचे विचार आणि हिंदुत्वाबाबत उलटतपासणीत चर्चा

न्यायालयीन कामकाजात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना “तात्या” या टोपणनावाने ओळखले जात असल्याचे नमूद करण्यात आले. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सावरकरांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या कालखंडातील विविध ऐतिहासिक घटनांचा सखोल मागोवा घेतला गेला. सावरकरांच्या विविध पुस्तकांमधून आणि साहित्यातून त्यांचे सामाजिक, राजकीय तसेच वैचारिक पैलू स्पष्ट होतात. सावरकरांची खरी विचारसरणी समजून घेण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या लेखनाचा अभ्यास करणे आवश्यक आहे, ही बाब सात्त्यकी सावरकर यांनी उलटतपासणीदरम्यान मान्य केली. तसेच “हिंदुत्व” हा सावरकरांच्या वैचारिक भूमिकेचा अत्यंत कणा आणि महत्त्वाचा भाग असल्याचेही समोर आले.

याशिवाय, सावरकरांच्या लेखनात हिंदू आणि मुस्लिम समाजाशी संबंधित विविध राजकीय प्रश्नांवर सविस्तर चर्चा आढळते. सावरकरांनी “हिंदू राष्ट्र” आणि “हिंदुत्व” या विषयांवर विस्तृत लेखन केले असून, त्यांच्या मुस्लिम समाजाशी संबंधित विचारांचा खरा अर्थ त्यांच्या स्वतःच्या साहित्यातूनच अचूकपणे समजून घेता येऊ शकतो, या मुद्द्यावरही आजच्या उलटतपासणीत प्रकाश टाकला गेला.

गोपाळ गोडसे यांच्या मुलाखतीचा संदर्भ व सात्त्यकी सावरकरांची प्रतिक्रिया

उलटतपासणीदरम्यान राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी एक अत्यंत संवेदनशील आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारा संदर्भ समोर आणला. सात्त्यकी सावरकर यांचे आजोबा गोपाळ गोडसे यांनी भूतकाळात दिलेल्या एका वादग्रस्त मुलाखतीचा हवाला देत ॲड. पवार यांनी प्रश्न विचारला की, "गोपाळ गोडसे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) तुलना चोरांबरोबर केली होती; याबाबत तुमचे वैयक्तिक किंवा अधिकृत मत काय आहे?"

या अतिशय थेट आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रश्नावर सावध पवित्रा घेत सात्त्यकी सावरकर यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले की, "यावर मला काहीही भाष्य करायचे नाही."

महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत व मुस्लिमविरोधी विचारांवर प्रश्न

तसेच, त्याच मुलाखतीमध्ये गोपाळ गोडसे आणि सिंधू गोडसे यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत कोणताही पश्चात्ताप न व्यक्त करता उलट आनंद व्यक्त केला होता, या कथित विधानांच्या समर्थनाबाबत आणि गोपाळ गोडसे यांच्या मुस्लिमविरोधी विचारांच्या संदर्भाबाबतही ॲड. पवार यांनी सात्त्यकी सावरकरांना प्रश्न विचारले. यावरही सात्त्यकी सावरकर यांनी "यावर मला कोणतेही मत व्यक्त करायचे नाही," अशीच भूमिका कायम ठेवली.

दरम्यान, फिर्यादी पक्षाचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी या प्रश्नांवर कायदेशीर आक्षेप घेत तीव्र हरकत घेतली. या कायदेशीर युक्तिवादानंतर आणि उलटतपासणीच्या विविध टप्प्यांनंतर न्यायालयीन कामकाज नियमितपणे सुरू राहिले. मात्र, न्यायालयाची दैनंदिन वेळ संपल्यामुळे आजच्या दिवसापुरता सात्त्यकी सावरकर यांचा उलटतपास पूर्ण झाला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी आगामी गुरुवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे.

या बहुचर्चित खटल्यात राहुल गांधी यांच्या वतीने ॲड. मिलिंद पवार यांना ॲड. ज्ञानेश्वरी जाधव, ॲड. अनुष्का डोके, ॲड. सायली कांबळे आणि ॲड. निलेश प्रजापती हे कायदेशीर सहकार्य करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *