Pune : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ५१ लाख सुवासिक फुलांची भव्य सजावट

Pune : पुणे शहरातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मोगरा महोत्सव आणि वासंतिक उटीच्या निमित्ताने यंदा तब्बल ५१ लाख सुवासिक फुलांची भव्य सजावट करण्यात आली आहे.

विविधरंगी आणि सुगंधी फुलांनी सजलेला गाभारा आणि सभामंडप पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. फुलांच्या साजात विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पाचे मनोहारी रूप भक्तांनी डोळ्यांत साठवून घेतले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही वासंतिक उटी आणि मोगरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोगऱ्यासह लिली, झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा, शेवंती, गुलछडी, कमळ, जाई-जुई अशा विविध फुलांचा वापर करून आकर्षक सजावट साकारण्यात आली.

गाभाऱ्यातील सजावट पाहताना जणू गणरायाला फुलांचे अर्घ्य अर्पण केल्याचा भास भक्तांना होत होता. या विशेष सोहळ्यात संत साहित्यिक डॉ. आरती दातार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणरायाला शुंडाभूषण, मुकुट आणि विविध फुलांचे दागिने परिधान करण्यात आले होते, ज्यामुळे बाप्पाचे रूप अधिकच देखणे दिसत होते.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले की, या पुष्पसजावटीसाठी मागील दोन दिवसांपासून कारागीर सातत्याने मेहनत घेत होते. विविध प्रकारच्या सुगंधी फुलांचा समावेश करून यंदाची सजावट अधिक आकर्षक करण्यात आली. मंदिर परिसरातील ही रंगीबेरंगी सजावट भक्त मोबाईलमध्ये टिपताना दिसत होते.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *