Pune : ‘शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, भरघोस परतावा मिळवा’ असा आमिष दाखवून 2.93 कोटींची फसवणूक; पुण्यात आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा पर्दाफाश

Pimpri-Chinchwad : IPO गुंतवणुकीच्या नावाखाली अल्पावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल २ कोटी ९३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आंतरराज्यीय तसेच आंतरराष्ट्रीय कनेक्शन असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

तक्रारदाराला शेअर मार्केटमधील IPO मध्ये गुंतवणूक केल्यास प्रचंड नफा मिळेल, असे आमिष आरोपींनी दाखवले. सुरुवातीला विश्वास बसावा यासाठी काही व्यवहार दाखवण्यात आले. त्यानंतर हळूहळू मोठ्या रकमा गुंतवायला भाग पाडत आरोपींनी २.९३ कोटी रुपये उकळले.

मात्र, गुंतवणुकीवर कोणताही परतावा न मिळाल्याने आणि आरोपी संपर्काबाहेर गेल्याने तक्रारदाराला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

तपासात काय उघड झाले?
तपासादरम्यान आरोपींनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील खात्यात १ लाख २५ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतल्याचे समोर आले. हे खाते ‘अरशील इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने उघडण्यात आले होते.

आरोपींना अटक कशी झाली?
सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे नवी मुंबई गाठत तुर्भे पोलिसांच्या मदतीने सुशील भगवान जुवाटकर याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पंकज राज कपूर आणि निश्चल टंकबीर बरेयली या साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

तपासात उघड झाले की, हे दोघे यापूर्वी बँकॉक आणि म्यानमार येथे सायबर फसवणुकीसाठी चालवल्या जाणाऱ्या कॉल सेंटरमध्ये काम करत होते. भारतात परतल्यानंतर ते नवी मुंबईत अशाच प्रकारचे कॉल सेंटर सुरू करण्याच्या तयारीत होते.

फसवणुकीची पद्धत
ही टोळी बनावट कंपन्यांच्या नावाने बँक खाती उघडत असे. विविध बँकांचे अकाउंट ओपनिंग किट, QR कोड, POS मशीन यांचा वापर करून पैसे गोळा केले जात. वेगवेगळ्या ओळखी वापरून नागरिकांचा विश्वास संपादन करून त्यांना जाळ्यात ओढले जात होते.

मोठा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून ६ मोबाईल फोन, ३ पासपोर्ट, ३ POS मशीन, २ लॅपटॉप, २ हार्डडिस्क, २ QR स्कॅनर, १२ बनावट शिक्के, २४ बँक अकाउंट ओपनिंग किट आणि ५ डेबिट कार्ड असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईमुळे मोठ्या सायबर फसवणूक रॅकेटचा भांडाफोड झाला असून, आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे याचा तपास सुरू आहे. पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *