Land Deal Case: Court Rejects Anticipatory Bail for Kalpana Kharat; Ashok Kharat Falls Ill During Proceedings

भोंदू खरात प्रकरणाला नवं वळण; ‘त्या’ महिलांवरच कारवाईची मागणी, लेखिकेचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

 Nashik :नाशिकमधील भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणात नवी आणि वादग्रस्त घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, खरातकडे स्वेच्छेने गेलेल्या महिलांनाही दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं असून चर्चा अधिक तीव्र झाली आहे.

महिलांवरच कारवाईची मागणी

सबाने यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, ज्या महिला स्वतःच्या इच्छेने भोंदू अशोक खरातकडे गेल्या, त्यांना ‘पीडित’ न मानता त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी. काही व्हिडिओंमध्ये महिला स्वेच्छेने वागताना दिसत असल्याचा दावा करत, अशा महिलांना लैंगिक समाधानासाठी गेल्याचा संशय व्यक्त करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, ज्या महिलांना कुटुंबीयांनी जबरदस्तीने खरातकडे पाठवलं असेल, त्यांनाच ‘पीडित’ मानावं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

चाकणकरांवरही कारवाईची मागणी

या प्रकरणात माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही कारवाई व्हावी, अशी मागणी सबाने यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय आणि सामाजिक पातळीवरही खळबळ उडण्याची शक्यता आहे.

अशोक खरात सध्या न्यायालयीन कोठडीत

स्वतःला ज्योतिषी म्हणवणाऱ्या अशोक खरातने महिलांना गोड बोलून, भुलवून किंवा धमकावून आपल्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. त्याने महिलांना पेढा आणि विशेष पेय देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. इतकंच नाही, तर या कृत्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केल्याचं तपासात समोर आलं आहे.

या प्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून 17 मार्च रोजी पोलिसांनी अशोक खरातला अटक केली असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (SIT) करत आहे.

मुलाचा धक्कादायक खुलासा

दरम्यान, SITने खरातच्या मुलालाही ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. सुरुवातीला मौन बाळगणाऱ्या मुलाने चौकशीत महत्त्वाची माहिती दिल्याचं समोर आलं आहे.
घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम येत होती, मात्र त्या पैशांचा स्त्रोत काय होता, याची माहिती नसल्याचं त्याने सांगितलं. सर्व आर्थिक व्यवहारांवर अशोक खरातचं पूर्ण नियंत्रण असल्याची कबुलीही त्याने दिली आहे.

तपासाचा वेग वाढला

या प्रकरणात पोलिसांकडून संबंधित डॉक्टर, आर्थिक व्यवहाराशी जोडलेले लोक आणि इतर संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे. दरम्यान, अरुणा सबाने यांच्या पत्रामुळे या प्रकरणातील महिलांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 
 


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *