Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आवाहनाला मराठा बांधवांचा प्रतिसाद; गावोगावी आंदोलकांकडून उपोषणाला सुरुवात

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्यास सुरुवात केलीये. आज त्यांच्या उपोषणाचा ५ वा दिवस आहे. अशात आजपासून गावागावात आंदोलकांनी उपोषणाला बसावे असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला मराठा आंदोलकांनी मोठा प्रतिसाद दिलाय.

रविवारी सकाळपासून मराठा आरक्षणासाठी गावागावातून आंदोलकांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. यामध्ये महिलांचा देखील सहभाग आहे. महिलांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; हात थरथरले, आवाज झाला क्षीण, तरीही मागणीवर ठाम

सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या खामगाव (गोरक्ष ) येथे सकल मराठा बांधवांसह सर्व समाजातील लोकांनी मराठा आमदार तसेच महाराष्ट्र सरकार यांचा निषेध केलाय. यावेळी राज्य सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच राज्य सरकारचा जाहीर निषेध नोंदविण्यात आलाय.

मराठा महिलांचे साखळी उपोषण

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे मराठा महिलांचे साखळी उपोषण सुरू करण्यात आलेय. या आंदोलनाला मोठ्या संख्येने महिला पुरुषांचा पाठिंबा पहायला मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महिलांनी आता एल्गार पुकारला असून महिला भगिनी ही आता आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

मुख्यमंत्री व पंतप्रधानांच्या प्रतिमेला काळं फासलं

हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होताना पाहायला मिळतोय. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कुरुंदा गावात मराठा आंदोलकांनी परिवहन महामंडळाच्या चालत्या बसला थांबलं. तसेच बसवर लावण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजनांवरील पोस्टरवर असलेल्या मुख्यमंत्र्याच्या प्रतिमेला काळे फासले आहे. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी केली आहे.

नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधव आक्रमक झालेत. सुर्डी गावातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळलाय. मराठा समाजाबाबत नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्याची क्लिप व्हायराल झाली होती. त्यामुळे व्हायरल क्लिप बद्दल स्पष्टता देऊन समाजाची माफी मागण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी मराठा आंदोलकांनी नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

नाशिकमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात

मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर नाशिकमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात झालीये. नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. सकल मराठा समाजातील साखळी उपोषणकर्ते नाना बच्छाव यांचे आमरण उपोषण सुरू झालेय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply