चाकणमध्ये ७८ किलोमीटरच्या रस्त्यांच्या एकात्मिक विकासाचे नियोजन; पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची महत्त्वाची माहिती

पुणे / चाकण: राज्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण परिसरातील पायाभूत सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कंबर कसली आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, वाहतूक कोंडी, अपुरे सेवा मार्ग आणि इतर समस्यांवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक पातळीवर हालचाली सुरू आहेत. चाकण औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रलंबित समस्या आणि विकासकामांबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उद्योजकांची एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बोलताना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चाकणमधील तब्बल ७८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या एकात्मिक विकासाचे (Integrated Development) नियोजन करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

चाकण आणि लगतच्या औद्योगिक पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर ऑटोमोबाईल कंपन्या, उत्पादन प्रकल्प आणि लघुउद्योग कार्यरत आहेत. याठिकाणी दररोज हजारो कामगार, कर्मचारी, व्यावसायिक आणि मालवाहतूक करणाऱ्या जड वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. परंतु, मागील काही काळापासून रस्त्यांची चाळण झाल्यामुळे, खड्ड्यांच्या समस्येमुळे आणि अपुऱ्या मार्गिकमांमुळे येथे नेहमीच भीषण वाहतूक कोंडी होत होती. या सततच्या वाहतूक कोंडीमुळे व खराब रस्त्यांमुळे कच्च्या मालाची वाहतूक आणि कामगारांच्या प्रवासावर मोठा परिणाम होत असून, उद्योगांनाही याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या सर्व गंभीर बाबींची दखल घेत प्रशासनाने आता हा प्रश्न तात्पुरत्या मलमपट्टीने नव्हे तर कायमस्वरूपी सोडवण्याचा निर्णय घेतला आहे.

बैठकीत माहिती देताना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले की, प्रशासन आणि उद्योजकांच्या परस्पर समन्वयातून चाकण औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधला जाईल. औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि जड वाहनांच्या वर्दळीचा ताण कमी करण्यासाठी ७८ किलोमीटरच्या रस्त्यांचा एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या विकासकामांमध्ये रस्त्यांचे बळकटीकरण, दर्जेदार डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण, योग्य पर्जन्य जलवाहिन्या (Storm Water Drains) आणि पथदिव्यांच्या सुविधांचा समावेश असणार आहे.

याशिवाय, वाहतूक नियंत्रणासाठी उद्योगांनी देखील प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कंपन्यांनी आपल्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी एमआयडीसीच्या निश्चित वाहनतळांचा (Parking) किंवा स्वतःच्या कंपनी परिसरातील जागेचा वापर करावा, जेणेकरून मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागणार नाहीत. तसेच, कामगारांच्या येण्या-जाण्याच्या वेळेतील ताण कमी करण्यासाठी कंपन्यांनी पाळ्यांच्या वेळांमध्ये (Shifts) आवश्यकतेनुसार बदल करण्याबाबत विचार करावा, असेही सूचित करण्यात आले आहे.

परिसरातील कचरा व्यवस्थापनाबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, घनकचऱ्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी एमआयडीसीने पीएमआरडीएला सुमारे ३६ एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा पूर्ण झाल्यानंतर परिसरातील ग्रामपंचायती आणि नगरपरिषदांनी कचऱ्याचे योग्य संकलन करून त्यावर प्रक्रिया करावी. या सर्व उपाययोजनांमुळे आगामी काळात चाकणमधील वाहतूक आणि दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागेल आणि औद्योगिक विकासाला अधिक गती मिळहमेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *