पुणे: FDA ची मोठी कारवाई! ५ दिवसांत ३८ लाखांचा संशयित भेसळीचा साठा जप्त

पुणे: दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुणे विभागात मोठी मोहीम हाती घेतली असून, अवघ्या पाच दिवसांत तब्बल ३८ लाख रुपयांचा संशयित भेसळीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

FDA च्या विशेष पथकांनी पुणे विभागातील विविध ठिकाणी छापे टाकून दूध, तूप, पनीर, मावा तसेच इतर दुग्धजन्य पदार्थांची तपासणी केली. कारवाईदरम्यान संशयास्पद साठे जप्त करण्यात आले असून, त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर संबंधितांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल.

विशेषतः सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत असल्याने भेसळीचे प्रकार रोखण्यासाठी FDA ने तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. नागरिकांनी संशयास्पद अन्नपदार्थ आढळल्यास तात्काळ FDA कडे तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *