खाकीतली खरी मानुसकी! पिरंगुट घाटात रस्ता साफ करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वतः हातात घेतला खराटा; संभाव्य भीषण अपघात टळल्याने सर्वत्र कौतुक!

पुणे जिल्ह्यातातील मुळशी तालुक्यातील प्रसिद्ध आणि वर्दळीच्या पिरंगुट घाट परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिक व वाहनचालकांसाठी एक अत्यंत प्रेरणादायी आणि कौतुकास्पद घटना समोर आली आहे. पिरंगुट घाटातील रस्त्यावरून कंत्राटी किंवा व्यावसायिक आरएमसी (RMC) वाहनांच्या वाहतुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर माती, खडी आणि सिमेंटची डस्ट रस्त्यावर सांडली होती. लवळे फाटा ते पिरंगुट घाट परिसरापर्यंत ही डस्ट पसरल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनांची चाके घसरून मोठे व प्राणघातक अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. घाटातील तीव्र वळणावर ही माती साचल्याने वाहनचालक नियंत्रण सुटून खाली पडत होते, ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

बावधन वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः हातात घेतला खराटा:

सध्याची गंभीर परिस्थिती आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन, बावधन वाहतूक विभागाचे कर्तव्यदक्ष पोलिस शिपाई मनोज गोसावी आणि पंडित धुळगंडे यांनी कोणतीही संकोच न बाळगता अत्यंत आदर्श व मानवीय भूमिका पार पाडली. केवळ वरिष्ठांच्या आदेशाची वाट न बघता किंवा इतर यंत्रणेची प्रतीक्षा न करता, या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी थेट घाटात स्वतः हातात खराटा (झाडू) घेतला आणि घाटातील रस्त्यावर साचलेली धोकादायक डस्ट व माती बाजूला सारण्यास सुरुवात केली. त्यांनी घाटातील वळणावळणाच्या रस्त्याची स्वच्छता करून रस्ता वाहनांच्या प्रवासासाठी पूर्णपणे सुरक्षित केला.

कर्तव्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक आणि वाहनचालकांकडून पोलिसांचे आभार:

पोलिस खात्यातील अधिकारी केवळ गुन्हेगारी किंवा दंडात्मक कारवाईसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि समाजहितासाठी किती तत्पर असतात, याचे उत्तम उदाहरण या दोन्ही कर्मचाऱ्यांनी सादर केले आहे. त्यांच्या या उत्स्फूर्त आणि साहसी सामाजिक कार्यामुळे पिरंगुट घाटातील संभाव्य मोठा अपघात टळला असून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर स्थानिक नागरिकांनी, प्रवाशांनी आणि सोशल मीडियावर सर्व स्तरांतून मनोज गोसावी व पंडित धुळगंडे यांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल भरभरून कौतुक केले जात आहे.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *