‘सावरकरांकडून देशाविरुद्ध इंग्रजांना मदत’, राहुल गांधींच्या विधानावर कुटुंब संतापलं, म्हणाले “शिवसेनेचे वारस वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींबरोबर पदयात्रा काढत आहेत.

‘भारत जोडो’ यात्रेमुळे सध्या चर्चेत असणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्याने वाद निर्माण झाला आहे. सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली असा आरोप त्यांनी केली आहे. राहुल गांधींच्या टीकेनंतर भाजपा नेते संताप व्यक्त करत असताना सावरकरांच्या कुटुंबीयांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधींची गळाभेट घेणाऱ्या आदित्य ठाकरेंना त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींच्या टीकेला उत्तर दिलं आहे. आपण राहुल गांधींविरोधात पोलीस तक्रार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. “क्रांतीकारकांशी राहुल गांधी यांचं काही देणंघेणं नाही. पण चंद्रशेखर आझाद, सावरकर देशद्रोही असल्याचं ट्वीट त्यांनी केलं होतं. याविरोधात मी भोईवाडा कोर्टात दाद मागितली होती. कोर्टाने पोलिसांना तपास करण्याचा आदेश दिला होता. पण आता मी दुसरी तक्रार दाखल करणार आहे,” असं रणजीत सावरकर यांनी सांगितलं आहे.

पुढे ते म्हणाले की “ब्रिटिशांनीही कधी सावरकरांनी माफी मागितल्याचं म्हटलेलं नाही. पण दुर्दैवाने आपल्या देशात तसं बोललं जात आहे. मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अपमान केला होता, तेव्हा बाळासाहेबांनी मुंबईत पाय ठेवू देणार नाही असं सांगितलं होतं. शिवतीर्थावरच जोडे मारो आंदोलन झालं होतं. पण दुर्दैवाने आज त्याच शिवसेनेचे वारस वारंवार सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींबरोबर पदयात्रा काढत आहेत. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी काँग्रेस नेते स्मृतीस्थळावर येणार असल्याचंही मला कळलं आहे”.

“आज बाळासाहेबांचा स्मृतीदिन आहे. अशा पवित्र दिनीही नाना पटोले यांनी पुन्हा असेच आरोप केले आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे वारसदार त्यांचं कसं स्वागत करतात हे मला पाहायचं आहे,” असंही ते म्हणाले.

“हिंदुत्ववादी शक्तींकडे सत्ता आली म्हणजेच वाजपेयी सरकार आल्यापासून सावकरांनी माफी मागितली अशा भूमिका घेण्यास सुरुवात झाली. तोपर्यंत इतके वर्ष कोणी काही म्हणत नव्हतं. १० वर्ष सरकार नव्हतं तेव्हा आरोप बंद झाले होते. पण २०१४ मध्ये सत्ता गेल्यानंतर पुन्हा आरोप सुरु झाले. त्यामुळे हा फक्त सत्तेचा खेळ आहे. सत्तेच्या खेळात महापुरुषाचा अपमान होत असल्याचं यांच्या लक्षात येत नाही आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

“सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी तुमच्या अंगावर पडेल असं प्रत्युत्तर त्यांनी नाना पटोलेंना दिलं आहे. सावकरांना बदनाम केलं तर हिदुत्वाची विचारधारा बंद होईल असं त्यांना वाटत आहे. पण ती हजार वर्षांपासूनची विचारधारा आहे. जोपर्यंत हिंदुत्व असेल तोपर्यंतच भारत सर्व धर्मांना समान न्याय देणारा ठरेल,” असंही त्यांनी सांगितलं.

“काँग्रेसबरोबर जावं लागलं तर माझं दुकान बंद करेन असं बाळासाहेब म्हणाले होते. पण आज त्यांच्या स्मृतिदिनी काँग्रेस नेते सावरकरांचा अपमान करतात. त्यांचं शिवसेने कसं स्वागत करते हे जनतेनेही पाहावं. आदित्य ठाकरे यांनी तर राहुल गांधींची गळाभेट घेतली. अशा व्यक्तीचा सहवासही तुम्ही टाळला पाहिजे. तुम्ही त्यांना ठामपणे आम्ही सावकरांचा अपमान सहन करणार नाही असं सांगितलं पाहिजे,” असा सल्ला रणजीत सावरकर यांनी दिला आहे.

एकीकडे देशासाठी अवघ्या २४ व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी त्यांनी अनेकवेळा माफीची पत्रे इंग्रज सरकारला लिहिली, अशी टीका खासदार राहुल गांधी यांनी क्रांतिकारक  बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त मंगळवारी आयोजित कार्यक्रमात  केली.

राहुल गांधी म्हणाले, सावरकर खरे देशभक्त नाहीत. ते तर इंग्रज राज्यकर्त्यांकडून निवृत्ती वेतन घेत होते. बिरसा मुंडा यांनी इंग्रज सरकारच्या विरोधात उठाव केला. त्यावेळी राज्यकर्त्यांनी मुंडा यांना पैसा, जमीन देण्याचा प्रयत्न केला. आमच्या कडून जे हवे ते घ्या, पण विद्रोह करू नका असे इंग्रजांचे म्हणणे होते, पण ते आमिषाला बळी पडले नाहीत. त्यांनी इंग्रज सरकारचा सामना केला. यात त्यांना आपले प्राण गमवावे लागले. सावरकर यांची विचारधारा देशाला तोडणारी आहे, तीच विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply