एन. रघुरामन यांचा कॉलम:डिजिटलदृष्ट्या स्मार्ट कर्मचारी असाल,तर इन्फ्लुएन्सरही बनू शकता

“सर, मला माझ्या कामाच्या ठिकाणच्या समस्या सोडवण्यासाठी तुमची मदत हवी आहे,” तो म्हणाला आणि समोरून काही प्रतिक्रिया येण्याआधीच पुढे बोलू लागला. एका मोठ्या संस्थेत काम करणारा हा कर्मचारी कामाच्या ठिकाणच्या वाढत्या ताणाबाबत समुपदेशकांची मदत मागत होता. तो म्हणाला, सर, मी दररोज सोशल मीडियावर कंपनीबद्दल काहीतरी पोस्ट करावे, अशी कंपनीची अपेक्षा असते. ते माझे अकाउंट तपासून माझ्या पोस्टना किती लाइक्स मिळाले हेही पाहतात. तुम्हीच सांगा. मी माझे टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. तेव्हा लोकांना आवडेल असा मजकूर मी कुठून आणू? समुपदेशकांनी शांतपणे त्याला विचारले, “पॅरेंटिंग, ब्यूटी आणि गेमिंगनंतर आता ‘वर्कफ्लुएन्सर्स’ (‘वर्क’ आणि ‘इन्फ्लुएन्सर्स’ या शब्दांपासून तयार झालेला शब्द) हा नवा ट्रेंड वेगाने वाढत आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? ते पुढे म्हणाले, “शाळेत मुलांशी कसे वागावे, याबद्दलचे अनुभव सांगणाऱ्या एका सामान्य शिक्षकालाही पॅरेंटिंग टिप्स देणाऱ्या तज्ज्ञ कंटेंट क्रिएटर्सपेक्षा जास्त फॉलोअर्स मिळत आहेत. यानंतर मी त्यांचे बोलणे लक्ष देऊन ऐकू लागलो. लिंक्डइनचे सीईओ डॅन शेपेरो यांच्या एका विधानाचा दाखला देत ते म्हणाले , “प्रत्येक वर्कफ्लुएन्सरसाठी हे कमाईचे एक अतिरिक्त साधन बनत चालले आहे.’ त्यांनी संगणक सुरू केला . लाखो फॉलोअर्स असलेल्या अशा काही वर्कफ्लुएन्सर्सची माहिती दिली. यामध्ये ‘फेडएक्स’ मध्ये रिक्रुटमेंट मार्केटिंग सल्लागार क्रिस्टी केनेब्रू यांचा समावेश आहे. त्या करिअरशी संबंधित टिप्स देतात आणि लिंक्डइनच्या वतीनेही आपल्या सुमारे 2 लाख 24 हजार फॉलोअर्ससाठी पोस्ट लिहितात. समुपदेशकांनी ‘एअरबीएनबी’ मध्ये काम करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचेही उदाहरण दिले. तो एआय व तंत्रज्ञान क्षेत्रातील कामाच्या अनुभवांबद्दल पोस्ट लिहितो. अवघे 45 हजार फॉलोअर्स असूनही त्याला स्पॉन्सर मिळाला आहे. अनेक कर्मचारी पोस्टच्या माध्यमातून कंपनीची रणनीती, नवीन उत्पादने, एआय टूल्स , उद्योग जगतातील घडामोडींची माहिती देतात. आता कंपन्याही अशा कर्मचाऱ्यांना ब्रँडचा प्रचार करण्यासाठी पैसे देत आहेत. कारण त्यामुळे त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढते. आपले बोलणे संपवताना समुपदेशक म्हणाले, “हा इन्फ्लुएन्सर्सचा नवा काळ आहे. यात एचआर विभागातील एखादा ऑफिस-असिस्टंटही आपल्या कंपनीत कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वातावरणाबद्दल बोलू शकतो.’ ते किती खरे बोलत होते! आज उद्योजकांचे सल्लागार त्यांना सांगत आहेत की, आपापल्या क्षेत्रात आधीच विश्वासार्हता निर्माण केली आहे अशा लोकांना ओळखा आणि पुढे आणा. मग त्यांचा मजकूर कंपनीच्या ब्रँडशी पूर्णपणे जुळणारा नसला तरी चालेल—किंबहुना त्याच कारणामुळे त्यांना पुढे आणा. आज मोठे ब्रँड्स स्वतःहून प्रचार करताना दिसू इच्छित नाहीत. त्याऐवजी, इतर नोकरदार वर्गासाठी उपयुक्त ठरेल असा मजकूर तयार करणाऱ्या क्रिएटर्सना मदत करण्यावर त्यांचा भर आहे. ‘स्टारबक्स’ सारख्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांमधील कंटेंट क्रिएशनचे कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवतात. पुढे हे कर्मचारी स्वतंत्र इन्फ्लुएन्सर बनतील आणि कंपनी सोडून जातील, असा धोका काहींना वाटतो. मात्र, माझा दृष्टिकोन वेगळा आहे. तुम्ही घरबसल्या काम करत राहिलात आणि ऑफिसच्या वातावरणातील चढ-उतारांशी जोडलेले राहिला नाहीत, तर इन्फ्लुएन्सर्सनाही नवीन कंटेंट तयार करण्यासाठी कल्पना सुचणार नाहीत. कर्मचाऱ्यांना माझा सल्ला आहे की, तुम्ही कुठे नोकरी करत असाल आणि तिथले व्यवस्थापन सोशल मीडिया कंटेंटसाठी तुमची मदत मागत असेल, तर ही संधी हातातून जाऊ देऊ नका. पुढे होऊन या उपक्रमात सहभागी व्हा आणि इतर कर्मचाऱ्यांच्याही कामी येईल असा मजकूर तयार करा. मात्र, हा मजकूर तयार करताना तुमची भाषा एखाद्या कोरड्या पीआर संदेशासारखी नसावी. तसेच कॉर्पोरेटची ठरलेली वाक्ये विचार न करता पुन्हा पुन्हा बोलणाऱ्या एखाद्या उतावळा सेल्समनसारखीही ती नसावी. त्याऐवजी तुमच्या मजकुरातून वाचकांच्या गरजांना प्राधान्य देऊन त्यांचा विश्वास जिंका. फंडा असा की, तुम्ही ‘वर्कफ्लुएन्सर’ बनून तुमच्या पगारापेक्षाही जास्त कमाई करू शकता. हा असा काळ आहे. स्मार्ट लोकांनी हे काम आधीच सुरू केले आहे. मग तुम्ही कधी सुरुवात करत आहात?

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *