एन. रघुरामन यांचा कॉलम:असामान्य मार्गानेही यश मिळू शकते

परिस्थिती कठीण असते, तेव्हा बहुतांश लोक नेहमीचेच मार्ग निवडतात. त्यांना वाटते की परिस्थिती सुधारेल. पण काही लोकांमध्ये पारंपरिक पद्धतींच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची क्षमता असते. याची काही उदाहरणे इथे दिली आहेत. यंदा पावसाअभावी आणि जमिनीत ओलावा कमी असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी रब्बी हंगामातील पेरणीसाठी धडपडत आहेत. ते हरभरा, ज्वारीसारख्या कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांकडे वळत आहेत. गव्हाच्या शेतीला मात्र मोठा फटका बसला आहे. अशा कठीण परिस्थितीत लातूर जिल्ह्यातील बाणेगावचे शेतकरी चंद्रकांत परिहार यांनी वेगळा मार्ग निवडला. 18 महिन्यांपूर्वी त्यांनी तैवान पिंक पेरूची सुमारे 2200 रोपे लावली. ठिबक सिंचन आणि सेंद्रिय शेतीद्वारे त्यांनी पाणी व खतांचे काळजीपूर्वक व्यवस्थापन केले. कमी पाऊस असूनही त्यांनी आपली बाग जगवली. परिणामी, या उत्पादनातून त्यांनी तब्बल 12 लाख रुपये कमावले. त्यांच्या या यशाने महाराष्ट्राच्या राज्यपालांचेही लक्ष वेधून घेतले. त्यांनी फोन करून परिहार यांचे अभिनंदन केले. परिहार यांनी केवळ दुष्काळावर मात केली नाही, तर त्याचा सामना करण्याचा नवा मार्ग शोधला. हा एक अत्यंत महत्त्वाचा फरक आहे. इतर गुंतवणूकदारांना सध्या अनिश्चिततेचे वातावरण दिसत आहे. अशा वेळी क्रिकेटचा दिग्गज सचिन तेंडुलकरच्या गुंतवणुकीत संधी ओळखण्याची अशीच क्षमता दिसून आली आहे. त्याने कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर क्षेत्रात कार्यरत असलेल्या हैदराबादच्या एका ‘सर्क्युलर इकॉनॉमी’ कंपनीत गुंतवणूक केली आहे. सध्या बाजारातील चढ-उतार आणि पारंपरिक गुंतवणूक पर्यायांमध्ये शेअरच्या घसरत्या किमतींमुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. अशा वेळी, तेंडुलकर यांनी कचऱ्याला मौल्यवान संसाधन मानणाऱ्या व्यवसायात गुंतवणूक केली आहे. त्यांची ही गुंतवणूक केवळ आर्थिक परताव्यासाठी नाही तर ती उपभोग, कचरा आणि पर्यावरणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याला दिलेले समर्थनही आहे. कंपनीच्या तंत्रज्ञानाचा उद्देश कचरा गोळा करणे, त्याची पुनर्प्राप्ती आणि पुनर्वापर अधिक व्यवस्थित करणे हा आहे. जेणेकरून, लोकांनी वापरलेले पॅकेजिंग फेकून देण्याऐवजी परत करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल. तेंडुलकरच्या सहभागामुळे या क्षेत्राला नवी ओळख मिळेल. आज या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाची गरज आहे. यातून असा धडा मिळत नाही की, शेअर बाजार घसरल्यावर प्रत्येक गुंतवणूकदाराने पुनर्वापराच्या (रिसायकलिंग) व्यवसायातच पैसा गुंतवावा. तर धडा हा आहे की, जिथे सर्वांचे लक्ष असते, अनेकदा संधी त्या ठिकाणांच्या बाहेरच मिळतात. यशस्वी गुंतवणुकीसाठीही क्रिकेटप्रमाणेच परिस्थिती समजून घेणे गरजेचे असते. केवळ इतरांचे आंधळेपणाने अनुकरण करणे योग्य नाही. तिसरे उदाहरण कोलकाता येथील एका रुग्णालयाचे आहे. तिथे एका डॉक्टरने दाखवून दिले की, अपारंपरिक विचार कधीकधी एखाद्याचा जीवही वाचवू शकतो. सहा वर्षांच्या एका मुलीने खेळण्यातील चुंबक गिळले. ते तिच्या उजव्या श्वसननलिकेत अडकले. त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी सुरुवातीला ‘ब्रोन्कोस्कोपी फोर्सेप्स’च्या मदतीने चुंबक काढण्याचा प्रयत्न केला. पण ते खूप वाईट पद्धतीने अडकले होते. तेव्हाच एका डॉक्टरच्या सल्ल्याने उपचाराची पद्धतच बदलली - चुंबक काढण्यासाठी चुंबकाचाच वापर का करू नये? ईएनटी प्राध्यापक दीप्तांशू मुखोपाध्याय चुंबक विकत आणायला गेले. योग्य अटॅचमेंट बनवून घेण्यासाठी त्यांनी लेथ मशीन ऑपरेटरशी संपर्क साधला. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार तीन तुकड्यांमध्ये अधिक शक्तिशाली चुंबक बनवून घेण्यात आले. या खास डिझाइन केलेल्या मॅग्नेटिक अटॅचमेंटला ब्रोन्कोस्कोपी उपकरणात बसवले गेले. त्यांच्या टीमने यशस्वीरीत्या चुंबक बाहेर काढले. यामुळे दोन्ही फुफ्फुसांमध्ये हवा खेळती राहिली. त्या मुलीला लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (पीडियाट्रिक आयसीयू) हलवण्यात आले. आता ती हळूहळू बरी होत आहे. या तिन्ही कथांचे वैशिष्ट्य केवळ त्यांचा निकाल नाही, तर कठीण परिस्थितीत नेहमीच्याच प्रतिक्रियांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची या तीन लोकांची इच्छाशक्ती, हे त्याचे खरे वैशिष्ट्य आहे. शेतकऱ्याने शेती सोडली नाही, क्रिकेटरने पारंपरिक गुंतवणुकीच्या पर्यायांपलीकडे पाहिले आणि नेहमीची वैद्यकीय उपकरणे कुचकामी ठरल्यावर डॉक्टरनेही हार मानली नाही. फंडा असा आहे की परिस्थिती कठीण असेल तेव्हा जे सगळेच करत आहेत, त्याच कामावर जास्त मेहनत घेऊ नका. कधीकधी वेगळा मार्ग निवडणे कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी खूप मदत करते.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *