नवी मुंबई: ट्रक चालकापासून अवघ्या पाच फुटांवर होता यमराज.. कोपरीत क्रेन कोसळल्याने ट्रक, दुचाकी आणि घराचे नुकसान

नवी मुंबई:  वाशी सेक्टर २६, कोपरी परिसरात रविवारी रात्री एका मोठ्या क्रेन दुर्घटनेमुळे खळबळ उडाली. या अपघातात एक ट्रक, दुचाकी आणि घराचे मोठे नुकसान झाले असून, ट्रक चालक मृत्यूच्या दाढेतून केवळ पाच फुटांच्या अंतरामुळे बचावला आहे.

घटनेचा सविस्तर तपशील: कोपरीतील पेट्रोल पंपाच्या मागे ‘सिडबी ऑफिसर्स क्वार्टर्स’च्या ठिकाणी ‘सबरी कन्स्ट्रक्शन’मार्फत सध्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास, बांधकाम साइटवर वापरली जाणारी एक टेलिस्कोपिक मोबाइल क्रेन अचानक असंतुलित झाली आणि थेट रस्त्यावर कोसळली.

 

ज्या वेळी क्रेन कोसळली, त्याच वेळी रस्त्यावरून एक ट्रक जात होता. क्रेन ट्रकवर आदळल्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावरील वर्दळ कमी होती, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या क्रेनच्या तडाख्यामुळे ट्रकसोबतच तिथे उभी असलेली एक दुचाकी आणि एका घराचेही नुकसान झाले आहे. ट्रक चालक थोडक्यात बचावला असला तरी, त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

पुढील कार्यवाही: घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी क्रेन चालक राजू शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली आहे. क्रेन नेमकी कशी असंतुलित झाली आणि बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेचे पुरेसे नियम पाळले होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *