कोल्हापूर: पाटगावमधील शिवाजीनगर कॉलनीत गॅस सिलिंडरचा स्फोट; दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी

कोल्हापूर: पाटगाव येथील शिवाजीनगर वसाहतीतील कुंडलिक अंकुश हडकर यांच्या घरी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन कुंडलिक हाडकर (वय ४२) हे गंभीर जखमी झाले. स्फोटात घराचे प्रापंचिक साहित्याचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कुंडलिक हाडकर हे घरातील गॅस सिलिंडर संपल्यानंतर नवीन गॅस सिलिंडर जोडत होते.

यावेळी गॅस सिलिंडरची सील चमच्याने काढत होते चुकून आतील नॉबला स्पर्श होऊन सिलिंडर आडवे पडले आणि शेजारी असलेल्या पेटलेल्या चुलीतील लाकडाचा स्पर्श होऊन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडर छपराकडे उडून खाली पडले. यामध्ये कुंडलिक हडकर गंभीर जखमी झाले. पत्नी व मुलगा लांब असल्याने थोडक्यात बचावले.

सिलिंडरचा स्फोट ऐकून सरपंच दीप्ती राऊत, अनिल सावंत, दत्तात्रय राऊळ, वसंत वास्कर, धोंडीराम मसुरेकर, यतीन पिळणकर, अनिषा सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.महसूल अधिकारी विनोद गुरव यांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेऊन घरातील एलपीजी गॅस सिलिंडर बाहेर काढून शेतामध्ये टाकले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, हडकर यांच्या घराचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. पंचनामा मंडल अधिकारी सातापा पवार व विनोद गुरव यांनी केला.

भुदरगडच्या तहसीलदार अर्चना पाटील पोलीस हवालदार डी. एन. पाटील आणि पोलिस अंमलदार बी.एस. परीट यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली, तसेच जखमी कुंडलिक हडकर यांना पाटगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी स्वाती चौगुले यांनी उपचार करून सीपीआरला पाठवले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *