कोल्हापुर: पोलिसांनी गर्भवती महिला शोधत रचला सापळा, हॉस्पिटलमध्ये धाड टाकून बेकायदेशीर गर्भपाताच्या रॅकेटचा केला पर्दाफाश

कोल्हापूर: एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील कदमवाडी परिसरातील 'प्रतिमा हॉस्पिटल'मध्ये बेकायदेशीरपणे गर्भपात करणाऱ्या एका माजी सिव्हिल सर्जनला करवीर पोलिसांनी धडक कारवाई करत रंगेहाथ पकडले आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी अत्यंत चलाखीने एका गर्भवती महिलेचा शोध घेतला आणि तिच्या माध्यमातून सापळा रचत थेट हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. या कारवाईमुळे आरोग्य वर्तुळात आणि संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, करवीर पोलिसांना कोल्हापूर शहरात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गर्भपात आणि गर्भलिंग निदानाचे रॅकेट सक्रिय असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या विशेष पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान पोलिसांनी एका गर्भवती महिलेचा शोध घेतला आणि पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून तिला संशयित हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. जसा गर्भपाताचा प्रकार सुरू झाला, तशी पोलिसांनी तातडीने कदमवाडी येथील 'प्रतिमा हॉस्पिटल'वर अचानक धाड टाकली. या धाडीत माजी सिव्हिल सर्जन डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड याला बेकायदेशीर गर्भपात करताना रंगेहाथ पकडण्यात आले.

प्राथमिक पोलीस चौकशीमध्ये या डॉक्टरने आतापर्यंत तब्बल २५० ते ३०० हून अधिक अवैध गर्भपात केल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड याने यापूर्वी पोलादपूर, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये सिव्हिल सर्जन म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. तसेच त्याने मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त अधीक्षक आणि पुण्यात सहाय्यक संचालक म्हणूनही अतिशय जबाबदारीच्या पदांवर सेवा बजावली होती. मात्र, प्रशासनात उच्च पदांवर काम केलेल्या या डॉक्टरनेच पैशांच्या लाभासाठी अशाप्रकारचे रॅकेट चालवल्यामुळे नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

पोलिसांनी संशयित आरोपी डॉ. गायकवाड याच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असतानाच अचानक त्याची प्रकृती बिघडल्याचे समोर आले, ज्यामुळे त्याला उपचारासाठी तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण रॅकेटमागे इतर कोणकोण व्यक्ती सामील आहेत, त्यांचे मोठे जाळे कुठे-कुठे पसरले आहे आणि यामध्ये किती एजंट कार्यरत आहेत, याचा कसून शोध सध्या करवीर पोलिसांकडून घेतला जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *