रत्नागिरी: वन विभागाची धडक कारवाई; सापळा रचून पोपटांच्या तस्करीचा पर्दाफाश, एक संशयित जेरबंद तर ६ पोपटांची सुटका

रत्नागिरी: वन्यजीवांच्या बेकायदेशीर तस्करीविरोधात एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी कारवाई समोर आली आहे. पोपटांची बेकायदेशीरपणे विक्री व तस्करी करणाऱ्या एका संशयिताला रत्नागिरी वन विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान आरोपीकडून ६ पोपट, एक दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे वन्यजीव तस्करांचे धाबे दाणाणले आहेत.

प्राप्त झालेल्या सविस्तर माहितीनुसार, रत्नागिरी शहराच्या परिसरामध्ये वन्यजीव असलेल्या पोपटांची बेकायदेशीरपणे विक्री व तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली होती. या मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी, पालीतील वनपाल तसेच रत्नागिरी आणि जाकादेवी येथील वनरक्षकांच्या पथकाने शुक्रवारी (२४ जुलै) दुपारी रत्नागिरी शहर परिसरात सापळा रचला. या सापळ्यात गुफरान निसार फणसोपकर (रा. जुना फणसोप, रत्नागिरी) या संशयित तस्कराला वन विभागाने ताब्यात घेतले.

तपासणीदरम्यान त्याच्याकडे बेकायदेशीररीत्या बाळगलेले ६ पोपट आढळून आले. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या विविध कलमांन्वये त्याच्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाईनंतर जप्त करण्यात आलेल्या सर्व पोपटांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून देण्यात आले.

ही यशस्वी कारवाई रत्नागिरी परिक्षेत्राचे वन अधिकारी विक्रम गुरव, वनपाल रत्नराज गायकवाड, विराज संसारे, शर्वरी कदम, तसेच प्राणीमित्र महेश धोत्रे, ईशान खानोलकर, प्रसन्न मालप, हरी गुरव आणि ओंकार मांडवकर यांच्या पथकाने पार पाडली. वन्यजीवांची शिकार करणे, त्यांना बेकायदेशीरपणे पकडणे किंवा त्यांची विक्री करणे हा अत्यंत गंभीर गुन्हा असून नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्याची माहिती मिळाल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा आणि वन्यजीव संरक्षणात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *