एन. रघुरामन यांचा कॉलम:काही करिअरमध्ये ‘डीजे’ होणेही एकटेपणावर मात करण्याचा उपाय?

आमच्याकडे स्वयंपाकाचे काम करणाऱ्या कमला साहू महिन्यात किमान दहा वेळा एकच तक्रार करतात. त्यांना रात्री दोन वाजण्यापूर्वी कधीच झोप लागत नाही. विशेष म्हणजे त्या रोज रात्री आठ वाजता आमच्या घरून निघतात आणि अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर राहतात. यामागचे कारण त्यांचा तिसरा अविवाहित मुलगा सतीश होता. तो दिवसा नोकरी करतो व रात्री डिस्क जॉकी (डीजे) म्हणूनही काम करतो. तो रात्री दीडच्या सुमारास घरी येतो. त्याला जेवण वाढल्यानंतरच कमलाताई झोपतात. गेल्या महिन्यात सतीशचे लग्न झाले. सहज बोलताना मी त्याला म्हटले, आता लग्न झाले आहे, तर डीजेचे काम सोडू शकतोस. त्यावर त्याने वेगळाच दृष्टिकोन मांडला. तो एका मोठ्या कंपनीच्या बॅकएंड विभागात काम करतो. त्या कामात एकटेपणाची भावना खूप जाणवते. त्यामुळे डीजे म्हणून काम केल्याने दिवसभर सर्जनशील राहण्यास मदत होते, असे त्याने सांगितले. सतीशच्या मते, डीजे संगीत म्हणजे परिचित ध्वनी नव्या पद्धतीने सादर करण्याची कला आहे. अनपेक्षित पद्धतीने दोन गाणी एकत्र आणणे किंवा एका गाण्यातून दुसऱ्याकडे सहज संक्रमण करणे यामुळे मेंदूला पूर्णपणे वेगळ्या कल्पना एकत्र जोडण्याची सवय लागते. याच कौशल्याचा उपयोग दैनंदिन कामातही होतो. जगातील अनेक यशस्वी उद्योजक काही तास डीजे म्हणून काम करतात. कारण त्यामुळे कल्पनाशक्तीला चालना मिळते. घरी परतल्यानंतर मी अशा उद्योजकांविषयी माहिती शोधली. डीजे संगीताशी जोडले गेल्याने नव्या कल्पना सुचवणे, समस्यांचे नावीन्यपूर्ण निराकरण करणे, विचारांत लवचिकता आणणे व भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त करणे यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या मेंदूतील प्रक्रियांना चालना मिळते, असे अनेकांचे निरीक्षण आहे. यामध्ये सर्वप्रथम लक्ष वेधून घेतले ते लंडनमधील फॅमिली लॉ फर्म ‘साउथगेट सॉलिसिटर्स’चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक हसन हादी यांनी. त्यांनी गेल्या वर्षी डीजे म्हणून काम सुरू केले. त्यातून सर्जनशीलता वाढली व कामावर अधिक लक्ष केंद्रित करता येऊ लागले, असा त्यांचा अनुभव आहे. सतीशलाही असाच अनुभव आला आहे. छंद म्हणून डीजेचे काम करणाऱ्या उद्योजकांमध्ये गोल्डमन सॅक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड सोलोमन, बीबीसीच्या ‘ड्रॅगन्स डेन’ कार्यक्रमातील पॅनेल सदस्य स्टीव्हन बार्टलेट, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्हिडिओ निर्मिती करणाऱ्या सिंथेसिस कंपनीचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिक्टर रिपरबेली यांचा समावेश आहे. शॉपिफायचे अध्यक्ष हार्ले फिंकेलस्टीन यांनी किशोरवयात डीजे कंपनी सुरू केली होती. आजही ते कंपनीच्या विविध कार्यक्रमांत डीजे म्हणून सहभाग घेतात. हसन हादी रोज त्यांच्या विधी सल्लागार संस्थेचे व्यवस्थापन, नेतृत्व आणि देखरेख करतात. आता ते स्वतः न्यायालयीन प्रकरणे हाताळत नसले तरी तरुण विधिज्ञांना काम मिळवून देण्यासाठी मदत करतात. त्यांच्या मते दिवसा लॉ फर्मचे व्यवस्थापन करणे आणि रात्री डीजे म्हणून काम करणे या दोन्हींसाठी जवळपास सारखीच कौशल्ये आवश्यक असतात. वकील आणि डीजे या दोघांनाही समोरची परिस्थिती ओळखून त्यानुसार तातडीने निर्णय घ्यावा लागतो. न्यायालयातील सुनावणी असो किंवा ग्राहकांसोबतची व्यावसायिक बैठक प्रत्येक वेळी परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता महत्त्वाची असते. विशेष म्हणजे काही जण साठीनंतरही डीजे म्हणून काम सुरू करतात. उदाहरणार्थ, टीना वुड्स. त्यांना ‘डीजे टीना’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी ब्रिटनमध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारीतून आरोग्य क्षेत्रातील नवकल्पनांसाठी ‘कोलायडर हेल्थ’ ही सल्लागार संस्था स्थापन केली आहे. आज 62 वर्षांच्या टीना सांगतात, उद्योजकाचे आयुष्य अनेकदा एकटेपणाने भरलेले असते. डीजे म्हणून काम केल्यामुळे मी सामाजिकदृष्ट्या लोकांशी जोडलेली राहते. अशा उद्योजकांची यादी मोठी आहे. काहींनी कंपनी सुरू करण्यापूर्वी डीजे म्हणून काम केले तर काही आजही हा छंद जोपासत आहेत. मात्र दिवसभर व्यवसाय किंवा तणावपूर्ण नोकरी करून घरी परतल्यावर लगेच झोपणाऱ्यांनीही तणाव कमी करण्यासाठी संगीताचा आधार घ्यायला हरकत नाही. डीजे होणे आवश्यक नाही, पण संगीताशी नाते जोडणे निश्चितच फायदेशीर ठरू शकते. फंडा असा की- जीवनात किंवा कामाच्या ठिकाणी जाणवणाऱ्या एकटेपणावर मात करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःसाठी एखादा मार्ग शोधायला हवा. एखाद्यासोबत बसून संगीत ऐकणेही एक प्रकारची प्रभावी उपचार पद्धती ठरू शकते.

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *