नवी मुंबई: पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह; दोन विद्यार्थिनींना शॉक, महापौर आणि MSEB आमनेसामने

नवी मुंबई: नेरुळ परिसरात पावसाच्या साचलेल्या पाण्यात विद्युतप्रवाह उतरल्याने दोन विद्यार्थिनींना विजेचा जोरदार धक्का बसल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१ जुलै) दुपारी घडली. एल.पी. ब्रिज परिसरातून पायी जात असताना दोघी पाण्यातून चालत होत्या. त्याचवेळी पाण्यात विद्युतप्रवाह उतरल्याने त्यांन जोरदार शॉक बसला आणि त्या रस्त्यावरच कोसळल्या. सुदैवाने वाहतूक पोलिस आणि एका रिक्षाचालकाने प्रसंगावधान राखत दोघींना सुरक्षित बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

प्राथमिक तपासात पावसाच्या पाण्यात विद्युतप्रवाह उतरण्यामागे भूमिगत वीज केबल किंवा शॉर्टसर्किट कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे .घटनास्थळी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEB/MSEDCL), महापालिका आणि अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून विद्युतपुरवठा आणि संबंधित यंत्रणेची तपासणी सुरू केली.

या घटनेनंतर नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी घटनास्थळी भेट देत तीव्र नाराजी व्यक्त केली. पावसाळ्यापूर्वी विद्युत यंत्रणेची तपासणी आणि देखभाल योग्य प्रकारे झाली का, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उघड्या किंवा धोकादायक विद्युत तारा, दोषपूर्ण उपकरणे आणि भूमिगत केबल्सची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर महापालिका आणि MSEB यांच्यात जबाबदारीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महापालिकेने विद्युत वितरण यंत्रणेकडे बोट दाखवले, तर MSEDCL ने संबंधित वीजजोडणी महापालिकेच्या स्ट्रीटलाईट यंत्रणेशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर नेमकी जबाबदारी कोणाची हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

सध्या दोन्ही विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या घटनेमुळे पावसाळ्यात पाणी साचलेल्या ठिकाणी नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, उघड्या किंवा संशयास्पद विद्युत तारा दिसल्यास तत्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 



शहर

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *