Pune Cyber Crime: Senior Citizen and Businessmen Looted of ₹1 Crore in Three Separate Scams

पुणे सायबर क्राईम: पुण्यात सायबर भामट्यांचा धुमाकूळ; ज्येष्ठ महिला आणि व्यावसायिकांची १ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक.

Pune Cyber Crime: Senior Citizen and Businessmen Looted of ₹1 Crore in Three Separate Scamsपुणे: पुणे शहरात सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये एका ज्येष्ठ महिलेसह दोन व्यावसायिकांची सुमारे १ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सहकारनगर, वारजे माळवाडी आणि खडक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

१. 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून ४३ लाखांना लुटले:
सहकारनगर परिसरातील एका ६८ वर्षीय ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी फोन केला. आपण नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगून चोरट्यांनी महिलेला धमकावले. "तुमच्या बँक खात्याचा वापर काळ्या पैशांच्या व्यवहारासाठी झाला असून तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल," अशी भीती त्यांना दाखवण्यात आली. अटकेची भीती दाखवून चोरट्यांनी महिलेला ८ ते १५ एप्रिल दरम्यान तब्बल ४३ लाख ७ हजार रुपये विविध बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली.

२. 'ऑनलाइन टास्क'च्या नावाखाली ३३ लाखांचा गंडा:
वारजे माळवाडी येथील एका ४३ वर्षीय व्यावसायिकाला "घरबसल्या कामाची संधी" असल्याचे आमिष दाखवण्यात आले. चोरट्यांनी त्यांना एका लिंकद्वारे ऑनलाइन टास्क दिले. सुरुवातीला काही पैसे परतावा म्हणून देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अधिक नफ्याच्या आमिषाने व्यावसायिकाकडून वेळोवेळी ३३ लाख ७२ हजार रुपये गुंतवून घेतले. मात्र, मुद्दल आणि नफा काहीच परत न मिळाल्याने व्यावसायिकाने तक्रार नोंदवली.

३. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २७ लाखांची लूट:
रविवार पेठ येथील एका ५५ वर्षीय व्यावसायिकाला शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. व्हॉट्सॲप मेसेजद्वारे त्यांना जाळ्यात ओढून चोरट्यांनी त्यांच्याकडून २७ लाख रुपये उकळले. पैसे भरूनही परतावा न मिळाल्याने त्यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलीस आवाहन:
पुणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पोलीस किंवा तपास यंत्रणेचे नाव घेऊन पैशांची मागणी केल्यास घाबरून जाऊ नका. तसेच ऑनलाइन टास्क किंवा शेअर बाजारातील अनधिकृत गुंतवणुकीला बळी पडू नका. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या क्रमांकावर संपर्क साधावा.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *