Pune : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; पुण्यासह विविध भागांत गारपीट व वादळी पावसाचा इशारा

Pune : पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागांत बुधवारी दुपारी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव आणि खराडी परिसरात गारांसह पाऊस झाला. सकाळपासून वाढलेल्या उकाड्यानंतर दुपारनंतर वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

दरम्यान, गुरुवार, 2 एप्रिल रोजीही राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दिवसभर वादळी पावसाचा अंदाज असून या भागांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

अवकाळी पावसामागचे कारण

भारतीय हवामान विभागाने 31 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. उपग्रह चित्रांनुसार राज्यावर, विशेषतः मुंबई–पुणे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसत आहेत. उत्तर भारतातून हे ढग हळूहळू दक्षिणेकडे सरकत असून पश्चिम भारतावर त्याचा अधिक प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

या ढगांच्या परिणामामुळे शहरी तसेच डोंगराळ भागांत पावसाची शक्यता वाढली आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण-बदलापूर परिसरात पावसाची शक्यता तुलनेने कमी असली तरी पुणे आणि लोणावळा भागात ती अधिक आहे. विशेषतः पश्चिम घाट परिसरात पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तापमानात घट

सततच्या पावसामुळे राज्यातील तापमानात घट झाली आहे. मार्चमध्ये 40 अंशांच्या जवळ पोहोचलेला पारा सध्या 32 ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. बुधवारी अमरावती येथे 38.4 अंश सेल्सिअस उच्चांकी तापमान नोंदवले गेले, तर निफाड येथे 17.8 अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद झाली.

पुढील अंदाज

पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर आकाश ढगाळ राहून संध्याकाळी वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटात हलक्या पावसाचा अंदाज आहे. यामुळे पुण्यासाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *