पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार; जखमी मंदार किवळेचा थरारक पहिला जबाब समोर!

पुणे: पुण्यातील अत्यंत वर्दळीच्या शिवाजीनगर न्यायालय परिसरात बुधवारी (२५ नोव्हेंबर २०२६) दुपारी घडलेल्या गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणात गंभीर जखमी झालेला मंदार किवळे याने ससून रुग्णालयातून पोलिसांना दिलेला पहिला जबाब समोर आला आहे. या जीवघेण्या हल्ल्यात मंदार गंभीर जखमी झाला असून, पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या पाच तासांत सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

भर दुपारी न्यायालयाबाहेर थरार

शिवाजीनगर न्यायालय परिसर हा कायमच नागरिक, वकील आणि पक्षकारांच्या गर्दीने गजबजलेला असतो. गेल्या आठवड्यात न्यायालयाला उडवून लावण्याची धमकी मिळाल्यामुळे पोलीस यंत्रणा आधीच हायअलर्टवर आणि बंदोबस्तात होती. मात्र, पोलिसांना न जुमानता सहा जणांच्या टोळक्याने बुधवारी दुपारी सुमारे एक वाजता मंदार किवळे याच्यावर गोळीबार करून कोयत्याने हल्ला केला. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या मंदारला चाटून गेल्या. तो खाली कोसळताच त्याच्यावर २० ते २५ वेळा कोयत्याचे सपासप वार करण्यात आले. डोक्यावर, पाठीवर, हातावर आणि मानेवर गंभीर जखमा झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. सध्या त्याच्यावर ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मंदार किवळेचा पोलिसांना पहिला जबाब काय?

गुरुवारी (२६ नोव्हेंबर) सकाळी पोलिसांनी ससून रुग्णालयात जाऊन मंदार किवळे याचा जबाब नोंदवला. हल्ल्याच्या थरारक घटनेबद्दल मंदारने सांगितले की, "आमच्या शुभमला तूच मारलंस ना?" असा सवाल सुरुवातीला दोघांनी केला आणि पिस्तूल रोखून गोळी झाडली; मात्र ती गोळी चुकली. त्यानंतर दुचाकीवर बसलेल्या एकाने, "याच्या डोक्यात कोयते टाका," असे म्हणताच इतरांनी कोयत्याने हल्ला चढवला. सपासप वार सुरू झाल्यानंतर त्यांना वाटलं हा जिवंत राहणार नाही. त्यामुळेच शुभमच्या खुनाचा बदला घेतला, असे तो ओरडून म्हणाल्याचे मंदारने पोलीस जबाबात सांगितले आहे.

"शुभम दादा, खुनाचा बदला घेतला" म्हणत कोयते फिरवले

हल्ल्यानंतर पळून जाताना आणि हल्ल्यादरम्यान आरोपींनी दिलेल्या घोषणांचाही मंदारने जबाबात उल्लेख केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, गोळीबार आणि कोयता हल्ल्यानंतर हल्लेखोर जोराजोरात ओरडले की, "शुभम दादा तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला आहे, आम्हीच कात्रजचे राजे आहोत." तसेच शुभमच्या नावाने घोषणा देत हल्लेखोरांनी भररस्त्यात कोयते हवेत फिरवून परिसरात मोठी दहशत निर्माण केली.

पाच तासांत सहा आरोपींना अटक

या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या पाच तासांत अक्षय चव्हाण, बाब्या पवार, यणप्पा, रोहन कानगुडे, गणेश चव्हाण आणि रोहन चव्हाण या सहा आरोपींना अटक केली. कात्रजमधील शुभम चव्हाण याच्या जुन्या खून प्रकरणाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *