‘घोस्ट पार्टिकल्स’:नोबेल विजेते फ्रान्सिस हॅल्झेन यांच्या ‘आइसक्यूब’ क्रांतीचा वेध; वाचा प्रा. डॉ. शंकर बिराजदार यांचा लेख

दर सेकंदाला सूर्यापासून निघालेले तब्बल ६५ अब्ज अदृश्य कण तुमच्या करंगळीच्या नखामधून आरपार निघून जातात, आणि तुम्हाला त्याची साधी जाणीवही होत नाही! विज्ञानाच्या दुनियेत 'घोस्ट पार्टिकल्स' किंवा 'मायावी कण' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच 'न्यूट्रिनो' कणांच्या शोधाला २०२६ च्या भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. अंटार्क्टिकाच्या २ किलोमीटर खोल बर्फाखालील 'आइसक्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी'मधील निर्णायक योगदानासाठी आणि खगोलभौतिकीय उत्पत्तीच्या उच्च-ऊर्जा न्यूट्रिनोचा शोध लावल्याबद्दल प्राध्यापक फ्रान्सिस हॅल्झेन यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाला आहे. जिथे प्रकाशाचे किरणही थबकतात, तिथे या अदृश्य कणांनी ब्रह्मांडाचे नवे दरवाजे कसे उघडले आणि या ऐतिहासिक प्रवासात भारताचा ठसा कसा उमटला आहे, याची ही रंजक सफर... निसर्गाने आपल्याभोवती अनेक गुपिते लपवून ठेवली आहेत. ज्यांचा शोध घेण्यासाठी मानवी बुद्धी सातत्याने धडपडत असते. कधी अथांग महासागराच्या तळाशी तर कधी अनंत अवकाशाच्या गर्भात दडलेली ही रहस्ये विज्ञानाच्या माध्यमातूनच जगासमोर येतात. मानवाने प्रत्येक युगात निसर्गाची ही आव्हाने स्वीकारली आहेत आणि याच मानवी कुतूहलातून विश्वाची निर्मिती कशी झाली, याचे रहस्य उलगडण्याचे प्रयत्न अविरत सुरू आहेत. जे डोळ्यांना दिसत नाही, जे कोणत्याही दुर्बिणीला सापडत नाही, अशा अदृश्य सृष्टीचा वेध घेणे हे विज्ञानापुढील सर्वात मोठे आव्हान राहिले आहे. निसर्गाच्या याच अनाकलनीय गूढतेचा भेद करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आपली बुद्धी पणाला लावत असतात. २०२६ चा भौतिकशास्त्र नोबेल: न्यूट्रिनो संशोधनाचा जागतिक सन्मान याच अविरत संशोधनाच्या प्रवासात, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर झालेल्या भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने पुन्हा एकदा अशाच एका अत्यंत गूढ, अदृश्य आणि 'रहस्यमय' कणाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मॅडिसनचे प्राध्यापक फ्रान्सिस हॅल्झेन यांना "आइसक्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरीमधील निर्णायक योगदानासाठी आणि खगोलभौतिकीय उत्पत्तीच्या उच्च-ऊर्जा न्यूट्रिनोच्या शोधासाठी" २०२६ चे प्रतिष्ठित नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. हा केवळ एका शास्त्रज्ञाचा सन्मान नसून, खगोलशास्त्राच्या एका नव्या युगाची ही भक्कम सुरुवात मानली जात आहे. या ऐतिहासिक पुरस्काराद्वारे अवकाशातून येणाऱ्या न्यूट्रिनोच्या एका विशाल प्रवाहाचा शोध अधिकृतपणे जगाने मान्य केला आहे. 'छोटा न्यूट्रॉन' ते नोबेल विजेता प्रवास: न्यूट्रिनोचा इतिहास या वैज्ञानिक क्रांतीची बीजे भौतिकशास्त्राच्या इतिहासात खोलवर रुजलेली आहेत. ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ वुल्फगँग पॉली यांनी १९३० मध्ये किरणोत्सर्गी मूलद्रव्यांच्या क्षयप्रक्रियेचे स्पष्टीकरण देण्यासाठी सर्वप्रथम न्यूट्रिनोची कल्पना मांडली होती. पुढे इटालियन शास्त्रज्ञ एन्रिको फर्मी यांनी या कणाला 'न्यूट्रिनो' (म्हणजे इटालियन भाषेत 'छोटा न्यूट्रॉन') असे नाव दिले. पदार्थांशी कोणतीही प्रक्रिया न करता आरपार निघून जात असल्यामुळे हा कण शोधणे तत्कालीन शास्त्रज्ञांना अशक्यप्राय वाटत होते. मात्र, क्लाइड कोवान आणि फ्रेडरिक रेनेस यांनी १९५६ मध्ये 'प्रकल्प पोल्टरगाईस्ट' अंतर्गत साव्हाना रिव्हर अणुभट्टीमधून निघणाऱ्या अँटी-न्यूट्रिनोचा स्रोत म्हणून वापर करत 'उलट बीटा क्षय' प्रक्रियेच्या आधारे न्यूट्रिनोचे प्रायोगिक अस्तित्व पहिल्यांदा सिद्ध केले. या प्रक्रियेत अँटी-न्यूट्रिनो पाण्यातील प्रोटॉनवर आदळल्याने तयार झालेल्या पॉझिट्रॉन, न्यूट्रॉन आणि गॅमा किरणांद्वारे न्यूट्रिनोची उपस्थिती स्पष्ट झाली. या क्रांतिकारी शोधासाठी फ्रेडरिक रेनेस यांना १९९५ चे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. भौतिकशास्त्राच्या व्याख्येनुसार, न्यूट्रिनो हे अत्यंत सूक्ष्म, विद्युतप्रभार नसलेले सब-ॲटोमिक पार्टिकल्स असून ते प्रामुख्याने इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो, म्युऑन न्यूट्रिनो आणि टाऊ न्यूट्रिनो या तीन प्रकारांत आढळतात. जेव्हा न्यूट्रिनो अंतराळातून किंवा पृथ्वीमधून प्रवास करतात, तेव्हा ते एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात स्वतःहून बदलतात. या क्वांटम मेकॅनिकल क्रियेला 'न्यूट्रिनो ऑसिलेशन' म्हणतात. २००२ मध्ये रेमंड डेव्हिस जुनियर आणि मासातोशी कोशिबा यांना खगोलभौतिकशास्त्रातील अग्रगण्य योगदानासाठी, विशेषतः 'कॉस्मिक न्यूट्रिनो' शोधून काढल्याबद्दल नोबेल पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला. त्यांनी सूर्याच्या केंद्रकात होणाऱ्या अणुसंयोजन प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या न्यूट्रिनोचा तसेच पृथ्वीपासून १,६०,००० प्रकाशवर्षे दूर असलेल्या 'सुपरनोव्हा 1987A' या ताऱ्याच्या स्फोटातून बाहेर पडलेल्या (मेगाइलेक्ट्रॉनव्होल्ट) ऊर्जेच्या न्यूट्रिनोंचा जपानमधील 'कमिओकांडे' भूमिगत प्रयोगशाळेतून शोध लावून न्यूट्रिनो खगोलशास्त्राचा पाया रचला. पुढे जपानच्या 'सुपर-कामिओकांडे' प्रयोगशाळेत ताकाकी काजिता यांच्या पथकाने वातावरणातील म्युऑन न्यूट्रिनो पृथ्वी पार करताना टाऊ न्यूट्रिनोमध्ये बदलत असल्याचे दाखवून न्यूट्रिनो ऑसिलेशनचा पहिला ठोस पुरावा दिला. कॅनडाच्या 'सडबरी न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी' चे शास्त्रज्ञ ऑर्थर बी. मॅकडोनाल्ड यांनी सूर्य सोडताना असलेले इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो पृथ्वीपर्यंत पोहोचेपर्यंत बदलतात हे सिद्ध करून यावर शिक्कामोर्तब केले. या शोधासाठी काजिता आणि मॅकडोनाल्ड यांना २०१५ चे नोबेल पारितोषिक मिळाले, ज्याने न्यूट्रिनोला वस्तुमान असल्याचे सिद्ध करत भौतिकशास्त्राच्या 'स्टँडर्ड मॉडेल'ला नवी दिशा दिली. 'न्यूट्रिनो'चे गूढ: ते सहजासहजी का सापडत नाहीत? 'कधीही न पकडता येणारे मायावी/रहस्यमय कण' किंवा 'घोस्ट पार्टिकल्स' म्हणून न्यूट्रिनोची ओळख का आहे, हा प्रश्न कायम राहतो. न्यूट्रिनोवर कोणताही वीजभार नसतो आणि त्याचे वस्तुमान इलेक्ट्रॉनपेक्षाही कोट्यवधी पटीने कमी—जवळपास शून्य असते. विद्युतभार नसल्याने ते विश्वातील चुंबकीय क्षेत्रांद्वारे विचलित न होता थेट स्रोतापासून सरळ रेषेत प्रवास करतात. हे कण कशाचीही पर्वा न करता आपल्या शरीरातून, खडकांमधून आणि संपूर्ण पृथ्वीमधून सेकंदाला विनासायास आरपार निघून जातात. सूर्यापासून सुटलेले तब्बल ६५ अब्ज न्यूट्रिनो दर सेकंदाला आपल्या करंगळीच्या नखामधून जात असतात, तरीही ते अणूंच्या केंद्रकाशी क्वचितच आंतरक्रिया करत असल्याने पारंपरिक उपकरणांनी त्यांना पकडणे अशक्य असते. अत्यंत दुर्मिळ प्रसंगी एखादा न्यूट्रिनो अणूच्या केंद्रकाशी आपटतो, तेव्हाच त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते. जिथे प्रकाश अपयशी ठरतो, तिथे न्यूट्रिनो मार्ग दाखवतो आजवर मानवाने विश्वाचे रहस्य समजून घेण्यासाठी प्रामुख्याने प्रकाशाचा वापर केला आहे. यात आपल्या डोळ्यांना दिसणारा 'दृश्य प्रकाश' तर येतोच, सोबतीला दुर्बिणींद्वारे पाहिला जाणारा क्ष-किरण किंवा गॅमा किरणांचाही समावेश होतो. म्हणजेच, जोपर्यंत ताऱ्यांमधून प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या ताऱ्याची माहिती मिळत नाही. परंतु, अंतराळात प्रवास करताना प्रकाशासमोर अनेक अडथळे येतात. प्रकाशाचे काही उच्च-ऊर्जा कण अंतराळातील शक्तिशाली चुंबकीय क्षेत्रांमुळे आपल्या सरळ मार्गापासून विचलित होतात (वळतात). यामुळे तो प्रकाश नेमका कुठून निघाला, याचा अचूक माग काढणे कठीण होते. अंतराळात प्रचंड मोठ्या प्रमाणावर वायू आणि धुळीचे ढग पसरलेले असतात. जेव्हा दूरच्या आकाशगंगेतून प्रकाश निघतो, तेव्हा हा प्रकाश त्या धुळीच्या कणांमध्ये शोषला जातो किंवा विखुरला जातो. यामुळे प्रकाशाची तीव्रता कमी होते किंवा तो आपल्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. या अडथळ्यांमुळे विश्वातील अनेक अतिशय महत्त्वाच्या आणि दुर्गम घटना (उदा. ब्लॅक होलच्या जवळ काय घडत आहे, ताऱ्यांचा जन्म कसा होतो) प्रकाशाच्या माध्यमातून डोळ्यांना/दुर्बिणींना दिसत नाही कधीच स्पष्ट दिसत नाहीत. नेमक्या याच ठिकाणी न्यूट्रिनो कणांचे महत्त्व स्पष्ट होते. आपली विलक्षण क्षमता आणि वैशिष्ट्यांमुळे हे कण अद्वितीय संदेशवाहक म्हणून समोर येतात न्यूट्रिनोवर कोणताही चुंबकीय प्रभाव पडत नाही आणि ते धुळीच्या ढगांमधूनही न शोषला जाता थेट आरपार निघून येतात. त्यामुळे, विश्वाच्या अगदी अतिदूर कोपऱ्यातून (जसे की महाविस्फोट किंवा ताऱ्यांचे स्फोट) निघणारे न्यूट्रिनो कोणतीही दिशा न बदलता किंवा ऊर्जा न गमावता सरळ आपल्यापर्यंत पोहोचतात. जिथे प्रकाश अपयशी ठरतो, तिथे न्यूट्रिनो आपल्याला विश्वाचे 'स्पष्ट आणि मूळ रूप' दाखवण्यास मदत करतात. न्यूट्रिनोचे वैविध्यपूर्ण स्रोत आणि अफाट ऊर्जा विश्वात सर्वाधिक प्रमाणात आढळणाऱ्या या कणांचे अनेक वैविध्यपूर्ण स्रोत आहेत. सौरमालेतील सर्वात मोठा स्रोत सूर्य असून, त्याच्या केंद्रकातील अणू संयोजनातून दर सेकंदाला अब्जावधी मेगाइलेक्ट्रॉनव्होल्ट इतकी ऊर्जा असलेल्या पातळीवरील न्यूट्रिनो बाहेर पडतात. आणि अवघ्या काही मिनिटांत पृथ्वीपर्यंत पोहोचतात. महाकाय ताऱ्यांचा अंत होताना होणाऱ्या सुपरनोव्हा स्फोटातून, वातावरणातील वायूवर कॉस्मिक किरण आदळल्याने, तसेच पृथ्वीच्या पोटातील युरेनियम व थोरियमच्या नैसर्गिक विघटनातून (भू-न्यूट्रिनो) यांची निर्मिती होते. मानवानेही अणुकेंद्रकीय भट्ट्यांमध्ये विखंडनातून उप-उत्पादन म्हणून आणि पार्टिकल अ‍ॅक्सिलेरेटर्समध्ये कृत्रिमरीत्या न्यूट्रिनोचे तीव्र झोत तयार केले आहेत. मात्र, विश्वातील आकाशगंगांच्या केंद्रस्थानी असणारे सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल आणि ॲक्टिव्ह गॅलेक्टिक न्यूक्लीआय व ब्लेझर्स यांसारख्या नैसर्गिक गतिवर्धकांमध्ये—प्रचंड वेगाने धावणारे प्रोटॉन्स आदळून 'पायॉन्स' तयार होतात, ज्यांच्या विघटनातून (पेटाइलेक्ट्रॉनव्होल्ट) पातळीचे अति-उच्च ऊर्जेचे न्यूट्रिनो जन्माला येतात. पेटाइलेक्ट्रॉनव्होल्ट म्हणजे १ च्या पुढे १५ शून्ये (१,००,००,००,००,००,००,००० eV) इतकी प्रचंड ऊर्जा! सूर्याकडून येणारे शांत मेगाइलेक्ट्रॉनव्होल्ट इतकी ऊर्जा असलेले न्यूट्रिनो अंतर्गत गाभ्याचे थेट दर्शन घडवतात, तर पेटाइलेक्ट्रॉनव्होल्ट इतकी ऊर्जा असलेले न्यूट्रिनो हे अंतराळातील महाभयंकर वादळासारखे असून सूर्य-न्यूट्रिनोपेक्षा १ अब्ज पटीने अधिक शक्तिशाली असतात आणि करोडो प्रकाशवर्षे दूरच्या घटनांचा थेट आपल्यापर्यंत पत्ता घेऊन येतात. 'आइसक्यूब' प्रयोगशाळेची संकल्पना आणि सुरुवातीचा संघर्ष दक्षिण ध्रुवावरील 'आइसक्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी'ने बर्फाखाली तब्बल २ किलोमीटर खोलीवर याच पेटाइलेक्ट्रॉनव्होल्ट इतकी ऊर्जा असलेले महा-ऊर्जावान कणांचा शोध लावला असून, यासाठीच २०२६ चे फ्रान्सिस हॅल्झेन यांना नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. जगातील सर्वात मोठी बर्फावर आधारित न्यूट्रिनो प्रयोगशाळा असलेल्या 'आइसक्यूब' च्या निर्मितीचा इतिहास अत्यंत रंजक आणि खडतर संघर्षाने भरलेला आहे. या कल्पनेची सुरुवात १९८७ मध्ये झाली, जेव्हा शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॅल्झेन यांनी कॅन्सस विद्यापीठात दिलेल्या एका व्याख्यानादरम्यान उपस्थित हिमनदी शास्त्रज्ञ ई. झेलर यांनी त्यांना अंटार्क्टिकाच्या बर्फात न्यूट्रिनोच्या रेडिओ लहरी शोधण्याच्या रशियन योजनांबद्दल सांगितले. फ्रांसिस हॅल्झेन यांच्या पथकाने अभ्यास करून पेटाइलेक्ट्रॉनव्होल्ट इतकी उच्च ऊर्जा असलेल्या न्यूट्रिनोंचा शोध घेण्यासाठी 'रेडिओ लहरी पद्धत' अपुरी असल्याचे ठरवले आणि आपले संशोधन 'चेरेनकोव्ह प्रकाशाच्या' तंत्राकडे वळवले. चेरेनकोव्ह प्रकाशाचे तंत्र' म्हणजे विश्वातून येणारे अत्यंत सुक्ष्म न्यूट्रिनो जेव्हा अंटार्क्टिकाच्या खोल बर्फातील अणूंशी धडकतात, तेव्हा 'म्युऑन' सारखे प्रभारित कण तयार होतात. हे तयार झालेले कण बर्फाच्या माध्यमातून प्रकाशाच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने धावतात. यामुळे बर्फात एक निळसर प्रकाशाचा झोत निर्माण होतो. भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार निर्वातात प्रकाशाचा वेग सर्वाधिक असतो. परंतु, जेव्हा प्रकाश बर्फ माध्यमातून प्रवास करतो, तेव्हा त्याचा वेग थोडा मंदावतो. जर एखादा अति-उच्च ऊर्जेचा कण (उदा. म्युऑन) या बर्फ किंवा पाण्यातून, तिथल्या प्रकाशाच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने गेला, तर तिथे एक विशिष्ट निळसर प्रकाश निर्माण होतो. याच प्रकाशाला 'चेरेनकोव्ह प्रकाश' म्हणतात. जून १९८८ मध्ये हॅल्झेन आणि त्यांचे मित्र जॉन जी. लर्नड यांनी न्यूट्रिनो व त्यातून निघणारा प्रकाश टिपण्यासाठी नैसर्गिक बर्फाचाच माध्यम म्हणून वापर करण्याची अभिनव कल्पना मांडली. हॅल्झेन यांनी नंतर गमतीने नमूद केले होते की, जर ते नैसर्गिक बर्फाच्या प्रकाशकीय अडचणींबद्दल आधीपासून अज्ञानी नसते, तर कदाचित त्यांनी ही कल्पना तिथेच सोडून दिली असती, परंतु याच धाडसाने पुढे विज्ञानाचा इतिहास घडवला. या कल्पनेची पहिली व्यावहारिक चाचणी १९९१ मध्ये ग्रीनलँडमधील बर्फाच्या थरांमध्ये प्रकाश संवेदक टाकून घेण्यात आली, ज्यातून नैसर्गिक बर्फ हा चेरेनकोव्ह प्रकाश वाहून नेण्यासाठी पुरेसा पारदर्शक असल्याचे सिद्ध झाले आणि १ किलोमीटर आकाराचा अवाढव्य डिटेक्टर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला. या यशानंतर अंटार्क्टिकामध्ये आइसक्यूबची पहिली आवृत्ती मानला जाणारा अमंडा' (अंटार्क्टिक म्युऑन आणि न्यूट्रिनो डिटेक्टर ॲरे) हा प्रकल्प १९९३ ते २००० दरम्यान उभारण्यात आला. ज्यामध्ये ग्लॅशिओलॉजीसाठी विकसित केलेल्या गरम पाण्याच्या उच्च दाबाच्या यंत्रणेचा वापर करून बर्फात १ किलोमीटर खोल छिद्रे पाडली गेली आणि त्यात सेन्सर्सच्या लांब केबल्स सोडण्यात आल्या. सुरुवातीला ८०० ते १००० मीटर खोलीवर बर्फात अडकलेल्या ५०-मायक्रॉनच्या सूक्ष्म हवेच्या बुडबुड्यांमुळे प्रकाश विखुरला जात असल्याने न्यूट्रिनोचा अचूक मार्ग शोधण्यात अडचण आली, ज्यावर तोडगा म्हणून शास्त्रज्ञांनी पुढील केबल्स १५०० ते २००० मीटर इतक्या जास्त खोलीवर सोडल्या. जिथे प्रचंड दाबामुळे बर्फ संपूर्णपणे काचेसारखा शुद्ध आणि पारदर्शक झाला होता. मार्च २००१ मध्ये या प्रयोगाने वातावरणातील न्यूट्रिनो यशस्वीरित्या शोधून बर्फाच्या खाली न्यूट्रिनो शोधण्याची व्यवहार्यता सिद्ध केली आणि अखेर हा प्रकल्प २००९ मध्ये बंद करण्यात आला. थोडक्यात सांगायचे तर, आज ज्या 'आइसक्यूब' प्रयोगशाळेला २०२६ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे, तिची सुरुवात १९८७ मधील एका साध्या कल्पनेतून आणि ग्रीनलँड ते अंटार्क्टिका अशा २० वर्षांच्या खडतर वैज्ञानिक प्रवासानंतर झाली आहे. दक्षिण ध्रुवाच्या बर्फाखालील महाप्रयोग: 'आइसक्यूब'ची रचना आणि कार्यप्रणाली अमंडा' (अंटार्क्टिक म्युऑन आणि न्यूट्रिनो डिटेक्टर ॲरे) प्रकल्पाच्या अभूतपूर्व यशानंतर, 'आइसक्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी' उभारण्याचा अधिकृत प्रस्ताव १९९९ मध्ये 'नॅशनल सायन्स फाऊंडेशन' कडे सादर करण्यात आला, ज्यामध्ये फ्रान्सिस हॅल्झेन यांनी मुख्य संशोधक म्हणून जबाबदारी सांभाळली. या प्रस्तावाला मार्च २००२ मध्ये मंजुरी मिळाली आणि २००४ पासून अमुंडसेन-स्कॉट दक्षिण ध्रुव स्थानकाजवळील अंटार्क्टिक बर्फात प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. आज आइसक्यूब ही 'नॅशनल सायन्स फाऊंडेशन' द्वारे व्यवस्थापित आंतरराष्ट्रीय सुविधा असून १४ देशांमधील ५८ संस्थांचे सुमारे ४५० संशोधक यात कार्यरत आहेत. या प्रयोगशाळेत 'चेरेनकोव्ह प्रकाश' टिपण्यासाठी ६० ऑप्टिकल सेन्सर्स असलेल्या केबल्सच्या लांब मालिका वापरल्या गेल्या आहेत. या प्रत्येक सेन्सरमध्ये २५.४ सेमी व्यासाची, खालच्या दिशेने तोंड केलेली अर्धगोलाकार 'फोटॉमल्टिप्लायर ट्यूब' आणि प्रगत डिजिटायझिंग इलेक्ट्रॉनिक्स बसवलेले आहे, जे बर्फाच्या आत दर १७ मीटर अंतरावर १ किलोमीटरपेक्षा जास्त खोलीपर्यंत तैनात केले आहेत. या फोटॉमल्टिप्लायर सेन्सर्सनी गोळा केलेला डेटा विद्युत केबल्सद्वारे पृष्ठभागावर पाठवला जातो. गरम पाण्याच्या हाय-प्रेशर ड्रिलिंग तंत्रज्ञानाचा वापर करून २००५ ते २०१० दरम्यान एकूण ८६ केबल्स बर्फात सोडण्यात आल्या. या केबल्स १४५० मीटर ते २४५० मीटर खोलीवर, १२५ मीटरचे त्रिकोणी अंतर राखत एका षटकोनी रचनेत बसवण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे, ५००० पेक्षा जास्त ऑप्टिकल सेन्सर्स बसवून तयार झालेला हा १ घन-किलोमीटर आकाराचा बर्फाचा महाकाय तुकडा (ज्याचे एकूण वजन सुमारे १ गिगाटन आहे) अंतराळातील रहस्यमय न्यूट्रिनो कणांना टिपण्यासाठी सज्ज करण्यात आला आहे. सुमारे २,१०० मीटर खोलीच्या खाली, जिथे बर्फ सर्वात जास्त स्वच्छ आणि पारदर्शक आहे, तिथे चेरेनकोव्ह प्रकाशाचे शोषण (शोषले जाणे) साधारण २०० मीटर अंतरापर्यंत आणि विखुरणे (Scattering) ५० मीटर अंतरापर्यंत होते. या घन बर्फाचा अपवर्तनांक (Refractive Index) सुमारे १.३१ असून, अलीकडच्या संशोधनातून त्याचे विशिष्ट द्विविकिरण गुणधर्म (Birefringent properties) देखील समोर आले आहेत. या मुख्य प्रयोगशाळेच्या अगदी वर, बर्फाच्या पृष्ठभागावर 'आइसटॉप' (IceTop) नावाचे चेरेनकोव्ह डिटेक्टर्सचे एक जाळे बसवले आहे, जे ३००-TeV ते १-EeV या प्रचंड ऊर्जा श्रेणीतील कॉस्मिक-किरण एअर शॉवर्स (Cosmic-ray air showers) मोजण्याचे काम करते. हे आइसटॉप यंत्रणेला मर्यादित कोनातून येणाऱ्या बाहेरील अनावश्यक घटनांना गाळण्यासाठी (Veto) मदत करते. २०११ मध्ये बांधकाम पूर्ण झाल्यापासून, आइसक्यूब प्रयोगशाळा ९९% पेक्षा जास्त कार्यरत राहून (Uptime) अविरतपणे न्यूट्रिनो कणांच्या आकाशाचे निरीक्षण करत आहे. आइसक्यूबने नोंदवलेल्या न्यूट्रिनोच्या आंतरक्रिया प्रामुख्याने 'ट्रॅक्स' (Tracks - सरळ रेषा) आणि 'कॅस्केड्स' (Cascades - कारंजे) अशा दोन मुख्य प्रकारच्या आकृत्यांमध्ये विभागलेल्या असतात. या प्रक्रियेत शोधल्या गेलेल्या चेरेनकोव्ह फोटॉन्सच्या (प्रकाशाच्या कणांच्या) संख्येवरून न्यूट्रिनोची अचूक ऊर्जा ठरवली जाते, तर हे फोटॉन्स डिटेक्टर्सवर पोहोचण्याच्या वेळेच्या फरकावरून न्यूट्रिनो नेमका कोणत्या दिशेने आला आहे, याचा अचूक मार्ग शोधला जातो. कृष्णविवरांचा वेध आणि 'मल्टी-मेसेंजर खगोलशास्त्रा'चा उदय आइसक्यूबच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की या अति-उच्च ऊर्जेच्या कणांचा माग थेट अॅक्टिव्ह गॅलेक्टिक न्यूक्लियस म्हणजेच आकाशगंगांच्या अत्यंत तेजस्वी केंद्रभागांपर्यंत काढता येतो. जिथे फिरत्या सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलमध्ये धूळ आणि वायू पडल्यामुळे प्रकाशाच्या वेगाने धावणाऱ्या कणांचा एक तीव्र झोत तयार होतो; हा झोत थेट पृथ्वीच्या दिशेने असल्यास त्याला 'ब्लेझर' म्हटले जाते. ब्लेझर हा प्रत्यक्षात एक 'सक्रिय दीर्घिका केंद्रक' असतो, ज्याच्या मध्यभागी एक अवाढव्य कृष्णविवर असते. जेव्हा हे कृष्णविवर आजूबाजूचे पदार्थ स्वतःकडे खेचून घेते, तेव्हा त्याच्या तीव्र चुंबकीय क्षेत्रामुळे आणि फिरण्यामुळे कणांचे प्रचंड शक्तिशाली झोत प्रकाशाच्या वेगाने बाहेर फेकले जातात. २२ सप्टेंबर २०१७ रोजी आइसक्यूबने अशाच एका 'TXS 0506+056' नावाच्या ब्लेझरच्या दिशेने आलेल्या सुमारे २९०-TeV ऊर्जेच्या म्युऑन न्यूट्रिनोला यशस्वीरित्या टिपले, ज्याची माहिती एका मिनिटाच्या आत जगभरातील टेलिस्कोप्सना अलर्टद्वारे पाठवून या मल्टि-मेसेंजर खगोलशास्त्राचा पाया रचला गेला. याशिवाय, २०२२ मध्ये आइसक्यूबने पृथ्वीपासून ४.६ कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या 'NGC 1068' (Messier 77) या अतिशय जवळच्या आणि धूलिकणांनी वेढलेल्या गॅलेक्सीच्या केंद्रातून १-१० TeV ऊर्जा श्रेणीतील तब्बल ७९ न्यूट्रिनो शोधून काढले. जिथून येणारा गॅमा प्रकाश तेथील वायूच्या जाड थरांमध्ये शोषला गेला असला तरी न्यूट्रिनो मात्र थेट बाहेर पडण्यात यशस्वी झाले. अंतिम चित्रात 'गॅमा-रे बर्स्ट्स' (GRBs) देखील या न्यूट्रिनोचे संभाव्य स्रोत म्हणून सुचवले गेले असले तरी हजारपेक्षा जास्त निरीक्षणांमध्ये अद्याप त्यांच्याकडून थेट न्यूट्रिनो मिळण्यात यश आलेले नाही, ज्यामुळे भविष्यातील प्रयोगांकडे विश्वाचे हे गूढ उकलण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. न्यूट्रिनोच्या या ऐतिहासिक शोधामुळे विश्वाच्या अभ्यासाला 'मल्टी-मेसेंजर अ‍ॅस्ट्रॉनॉमी' नावाची एक पूर्णपणे नवीन आणि क्रांतिकारक दिशा मिळणार आहे. आजवर आपण अंतराळातील ज्या महत्त्वपूर्ण घटना (उदा. कृष्णविवर किंवा ताऱ्यांचे केंद्र) तिथल्या धूलिकणांमुळे आणि वायूच्या जाड थरांमुळे प्रकाशाच्या माध्यमातून पाहू शकत नव्हतो. त्या दुर्गम भागांचा वेध आता कोणत्याही अडथळ्याविना थेट न्यूट्रिनोच्या साहाय्याने घेता येणार आहे. या शोधामुळे गॅलेक्सीच्या केंद्रस्थानी असलेल्या महाकाय कृष्णविवरांचे रहस्य आणि तिथून निघणाऱ्या अत्यंत वेगवान कणांच्या झोतांची कार्यपद्धती उकलणे शक्य होईल. तसेच अंतराळात कॉस्मिक किरणांना प्रकाशाच्या वेगाने धावण्यासाठी ऊर्जा देणाऱ्या नैसर्गिक प्रवेगकांचा अचूक माग लावता येईल. इतकेच नव्हे तर, सुमारे १३.८ अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या बिग बँगच्या वेळी निर्माण झालेल्या मूळ न्यूट्रिनोंच्या अभ्यासातून विज्ञानाला विश्वाच्या जन्मानंतरच्या अवघ्या पहिल्या सेकंदाची तंतोतंत माहिती मिळू शकेल. या अभूतपूर्व यशामुळे प्रेरित होऊन आता आगामी दशकात जगभरात १ घन-किलोमीटरपेक्षा मोठ्या आकाराचे पुढील पिढीचे न्यूट्रिनो टेलिस्कोप उभारले जात असून, यामध्ये दक्षिण ध्रुवावरील 'आइसक्यूब-जेन२', भूमध्य समुद्रातील 'KM3NeT' आणि सायबेरियातील 'Baikal-GVD' यांसारख्या अत्याधुनिक जागतिक प्रकल्पांचा समावेश आहे, जे भविष्यात विश्वाचा अभ्यास करण्याची मानवाची पद्धत संपूर्णपणे बदलून टाकतील. न्यूट्रिनो संशोधनातील भारताचे ऐतिहासिक योगदान जागतिक पातळीवर न्यूट्रिनो संशोधनाचा पाया रचण्यात भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक राहिले आहे. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांच्या दूरदृष्टीमुळे कर्नाटकातील कोलार गोल्ड फिल्ड्स मधील चॅम्पियन रीफ खाणीच्या ८० व्या स्तरावर जमिनीखाली तब्बल २.३ किलोमीटर खोल ही ऐतिहासिक प्रयोगशाळा उभारण्यात आली होती. वर असणाऱ्या प्रचंड खडकांमुळे अवकाशातून येणारे कॉस्मिक किरण अडवले जाऊन केवळ न्यूट्रिनो कणांचा वेध घेणे शक्य झाले. टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ प्रा. एम. जी. के. मेनन यांच्या नेतृत्वाखाली, ब्रिटनच्या डर्हॅम विद्यापीठाचे प्रा. अर्नॉल्ड वोल्फेंडेल आणि जपानचे साबुरो मियाके यांच्या आंतरराष्ट्रीय सहकार्यातून १९६५ मध्ये वातावरणातील न्यूट्रिनो टिपण्याचा जगातील पहिला ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला. याच गौरवशाली वैज्ञानिक परंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत भारत आता कण भौतिकशास्त्र (Particle Physics) संशोधनासाठी 'इंडिया-बेस्ड न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी' (INO) हा महत्त्वाकांक्षी भूमिगत प्रयोगशाळा प्रकल्प उभारत आहे. ब्रह्मांड आणि वातावरणातील सूक्ष्म न्यूट्रिनो कणांचा सखोल अभ्यास करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यातील पोट्टीपुरम येथे एका महाकाय डोंगराखाली सुमारे १,२०० मीटर (१.२ किमी) खोलीवर ही प्रयोगशाळा प्रस्तावित आहे. ज्यामुळे कॉस्मिक किरणांपासून नैसर्गिक संरक्षण मिळेल; तर तेथे पोहोचण्यासाठी २.१ किमी लांबीचा बोगदा तयार केला जाणार असून मदुराई येथील 'इंटर-इन्स्टिट्यूशनल सेंटर फॉर हाय एनर्जी फिजिक्स' हे या प्रकल्पाचे मुख्य देखरेख आणि संशोधन केंद्र म्हणून काम करेल. या वेधशाळेचे प्रमुख आकर्षण 'आयरन कॅलरीमीटर' (ICAL) हा डिटेक्टर असेल, ज्यामध्ये सुमारे ५०,००० टन वजनाच्या चुंबकीय लोखंडी पट्ट्या वापरल्या जातील. जगातील सर्वात मोठ्या चुंबकीय संरचनेपैकी एक असणाऱ्या या तंत्रज्ञानामुळे न्यूट्रिनो आणि अँटी-न्यूट्रिनो यांमधील भेद अचूक ओळखता येईल. 'न्यूट्रिनो ऑसिलेशन', त्यांचे वस्तुमान आणि रूप बदलण्याची प्रक्रिया अभ्यासून ब्रह्मांडाच्या निर्मितीचे रहस्य उलगडण्याचा या प्रकल्पाचा मानस आहे. भारत सरकारच्या 'परमाणू ऊर्जा विभाग' आणि 'विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग' यांच्या संयुक्त अर्थसाहाय्याने साकारल्या जाणाऱ्या या महाप्रकल्पाची धुरा मुंबईच्या 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च' कडे मुख्य यजमान संस्था म्हणून सोपवण्यात आली असून, देशभरातील २६ हून अधिक आघाडीच्या संशोधन संस्थांचा यात सक्रिय सहभाग आहे. खगोलशास्त्राची नवी पहाट आणि उजळणारे विश्व विज्ञानाच्या इतिहासात काही शोध हे केवळ नवीन तथ्य समोर आणत नाहीत, तर विश्वाकडे पाहण्याचा मानवाचा दृष्टिकोनच मुळापासून बदलून टाकतात. २०२६ चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार अशाच एका क्रांतीवर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे. आजवर संपूर्ण मानवजातीने ब्रह्मांडाचा वेध घेण्यासाठी प्रामुख्याने 'प्रकाशा'चा आधार घेतला; परंतु कृष्णविवरांच्या सीमारेषा आणि ताऱ्यांचे भीषण स्फोट यांसारख्या अतिदुर्गम घटनांभोवती पसरलेले वायू व धुळीचे जाड पडदे भेदणे प्रकाशालाही शक्य झाले नाही. नेमक्या याच ठिकाणी निसर्गातील सर्वात गूढ आणि मायावी मानल्या जाणाऱ्या 'न्यूट्रिनो' या अदृश्य कणांनी विज्ञानाला मार्ग दाखवला आहे. अंटार्क्टिकाच्या अथांग बर्फात दोन किलोमीटर खोल उभारण्यात आलेली 'आइसक्यूब' वेधशाळा आणि प्रा. फ्रान्सिस हॅल्झेन यांचे दीर्घकालीन संशोधन यामुळेच मानवाला अंतराळातील अती-शक्तिशाली पेटाइलेक्ट्रॉनव्होल्ट इतकी उच्च ऊर्जा असलेल्या न्यूट्रिनों कणांचा शोध घेणे शक्य झाले. हा शोध केवळ खगोलभौतिकशास्त्राचा विजय नसून, 'मल्टी-मेसेंजर खगोलशास्त्रा'ची ही एक नवी पहाट आहे. या जागतिक यशाच्या निमित्ताने भारताच्या गौरवशाली वैज्ञानिक वारशाचीही प्रकर्षाने आठवण होते. साठच्या दशकात कर्नाटकातील कोलार गोल्ड फिल्ड्स च्या खाणीत २.३ किमी खोल जाऊन जगातील पहिल्या वातावरणीय न्यूट्रिनोची यशस्वी नोंद भारतीय शास्त्रज्ञांनी केली होती. तोच वारसा पुढे नेत भारत आता 'INO' (इंडिया-बेस्ड न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी) प्रकल्पाच्या माध्यमातून या संशोधनात स्वतःचे अग्रगण्य स्थान निर्माण करत आहे. थोडक्यात सांगायचे तर, ज्या अथांग विश्वाचा बहुतांश भाग आजवर प्रकाशाच्या मर्यादांमुळे मानवासाठी 'अंधारात' होता, ते रहस्यमय विश्व आता या मायावी न्यूट्रिनोंच्या प्रकाशाने अधिक स्पष्ट, पारदर्शक आणि उजळून निघणार आहे. (लेखक लातूर येथील दयानंद महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे अध्यापन करतात. त्यांच्याशी 9822736542 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधता येईल.)

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *