मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना

मुंबई: आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि मानवी संवेदनतेला काळीमा फाटणारी थरारक घटना समोर आली आहे. पती-पत्नीच्या किरकोळ वादातून एका क्रूर आणि नराधम बापाने स्वतःच्या अवघ्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवरून थेट खाली फेकून दिल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण मुंबई हादरली असून सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. या भीषण घटनेत नऊ महिन्यांचे निष्पाप बाळ गंभीर जखमी झाले असून, त्याच्यावर मुंबईतील प्रसिद्ध शीव रुग्णालयातील (Sion Hospital) अतिदक्षता विभागात (ICU) अत्यंत गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत.

घाटकोपर पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरती जाफर शेख (वय २२, रा. सर्वोदय नगर, घाटकोपर, मुंबई) असे या दुर्दैवी प्रकरणातील तक्रारदार महिलेचे नाव आहे. तर जाफर शेख (वय २३) असे अटक करण्यात आलेल्या संशयित नराधम पतीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आरती आणि जाफर यांचा सुमारे दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना आरव नावाचा ९ महिन्यांचा गोंडस मुलगा आहे. घाटकोपर परिसरामध्येच आरोपी जाफर हा कपडे विक्रीचा व्यवसाय करतो. मात्र, त्याला अमली पदार्थांचे आणि विविध प्रकारच्या व्यसनांची सवय जडली होती. याच व्यसनाच्या आणि घरगुती कारणांवरून गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये सतत खटके उडत होते आणि त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर वाद होत असत.

स्कायवॉकवर नेमके काय घडले? रविवारी (२६ ऑक्टोबर) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आरती शेख ही आपल्या अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाला सोबत घेऊन घाटकोपर पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकवर उभी होती. त्याच वेळी तिचा पती जाफर तिथे पोहोचला. तिथे पोहोचल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा एकदा जुन्या कारणांवरून जोरदार वाद सुरू झाला. वाद इतका विकोबाला गेला की, जाफरने बाळ जबरदस्तीने स्वतःकडे घेतले आणि तेथून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पत्नी आरतीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, चिडलेल्या नराधम जाफरने पोटच्या गोळ्याचाही विचार न करता संतापाच्या व रागाच्या भरात त्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्या आरव्ला थेट स्कायवॉकवरून खाली फेकून दिले.

आईचा टाहो आणि नागरिकांची मदत बाळाला खाली फेकल्याचे दृश्य पाहताच माता आरतीने हंबरडा फोडला आणि ती रडत-किंचाळत तातडीने स्कायवॉकवरून खाली धावली. तिथे जमलेल्या संतप्त व सतर्क स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या निष्पाप बाळाला तातडीने उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. परंतु, बाळाला लागलेली दुखापत अत्यंत गंभीर व डोक्याला मार बसल्याने त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला तातडीने पुढील विशेष उपचारासाठी मुंबईच्या शीव रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या शीव रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात डॉक्टर त्या चिमुकल्याचे प्राण वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत.

घाटकोपर पोलिसांची धडक कारवाई घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि अंमलदार तात्काळ घटनास्थळी व रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी पीडित माता आरती जाफर शेख हिची फिर्याद सविस्तरपणे नोंदवून घेतली. या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी आरोपी पती जाफर शेख याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न आणि बालकावर अत्याचार व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कसलाही विलंब न करता आरोपीला तातडीने अटक केली असून, या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू आहे. एका अनावश्या व्यसनापायी आणि कौटुंबिक कलहामुळे एका निष्पाप बालकाचा जीव धोक्यात आल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *