इंद्रायणी नदीवरील कुंडमळा बंधाऱ्याची अत्यंत दुरवस्था! खड्डे आणि भगदाडांमुळे अपघातांचा टळतोय मोठा धोका; नागरिकांकडून तातडीने दुरुस्ती व वाहतूक बंद करण्याची मागणी!

पुणे जिल्ह्यातील अत्यंत प्रसिद्ध आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यातील कुंडमळा (Indori / Kundmala) येथील इंद्रायणी नदीपात्रातील बंधाऱ्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या बंधाऱ्यावरील भौगोलिक रचना आधीच धोकादायक असताना, त्यातच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बंधाऱ्याला अनेक ठिकाणी मोठे खड्डे आणि भगदाडे पडली आहेत. असे असतानाही यावरून विनासायास सुरू असलेली वाहनांची वर्दळ आणि नागरिकांची ये-जा कोणत्याही मोठ्या दुर्घटनेला थेट निमंत्रण देत असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये आणि पर्यटकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

पाणी वाहत असतानाही जीव धोक्यात घालून धोकादायक वाहतूक:

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पावसाळ्यानंतर किंवा नदीपात्रात पाण्याची आवक सुरू असताना आणि बंधाऱ्यावरून पाणी वाहत असतानाही अनेक दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक व पादचारी आपला जीव मुठीत धरून या धोकादायक मार्गावरून ये-जा करत असतात. बंधाऱ्याच्या काँक्रीटला पडलेल्या भेगा, मोठे खड्डे आणि मोकळ्या जागांमुळे वाहने घसरण्याची किंवा थेट नदीपात्रात कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी वाहनचालकांना रोखण्याचा प्रयत्न केला तरीही दुर्लक्ष केले जात असल्याने कधीही एखादी मोठी प्राणघातक दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी:

या गंभीर प्रकाराची दखल घेत इंदोरी व परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. संभाव्य मानवी जीवितहानी टाळण्यासाठी या जीर्ण झालेल्या कुंडमळा बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करावी आणि जोपर्यंत पूर्ण दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत यावरील सर्व प्रकारची वाहनांची आणि नागरिकांची वाहतूक पूर्णपणे बंद करावी, अशी आर्त हाक ग्रामस्थांनी दिली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *