पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!

पुणे: घरफोडीच्या गुन्ह्याचा तब्बल नऊ महिन्यांनंतर छडा लावण्यात वानवडीपोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या सोन्यापैकी ७४.८ ग्रॅम वजनाचे, सुमारे ७ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. धीरज उर्फ रंध्या रणधीर सावंत (वय २४, रा. अंजली नगर, कात्रज), विशाल संजय लोखंडे (वय २५, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, हडपसर), नारायण वसंत काळे (वय ४८, रा. नवरत्न चौक, विजयनगर, काळेवाडी), बाळासाहेब बबनराव पाटणकर (वय ५२, रा. जिज्ञासा सोसायटी, धनकवडी) आणि जितेश राजमल ओसवाल (वय ४१, रा. मार्केट यार्ड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलिस ठाण्यात ७ नोव्हेंबर २०२५ रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी छतावरून गॅलरीत प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच मुलांची महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रे चोरून नेली होती. या गुन्ह्याचा तपास सुरुवातीला पोलिस उपनिरीक्षक धनाजी टोणे आणि पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांनी केला. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे व त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली. तब्बल नऊ महिन्यांच्या तपासानंतर या गुन्ह्यातील पाच आरोपींचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. आरोपी धीरज सावंत याच्याकडून चोरीची शैक्षणिक कागदपत्रे जप्त करण्यात आली, तर आरोपी बाळासाहेब पाटणकर आणि जितेश ओसवाल यांच्याकडून चोरीच्या सोन्यापैकी ७४.८ ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत करण्यात आले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे ७ लाख ५० हजार रुपये आहे.

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास डाबेराव यांच्या सूचनेनुसार तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शेखर मोकाटे, पोलिस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे आणि पोलिस अंमलदार प्रमोद टिळेकर, अमोल पिलाणे, विनोद शिवळे, सचिन घोडके, सफराज देशमुख, संदीप साळवे, निलेश वनवे, दीपक क्षीरसागर, दया शेगर, बालाजी वाघमारे, अर्शद सय्यद, अभिजीत चव्हाण आणि चैतन्याली यादव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *