नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!

नाशिक: 'सह्याद्री'ची भूरळ साऱ्यांनाच पडते. हौशी गिर्यारोहक गड-किल्ल्यांच्या 'ट्रेक'ला जातात. अलीकडे रील्स बघून ट्रेक करणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. यामुळे डोंगरदऱ्या, कडेकपारी पार करताना हौशी गिर्यारोहक संकटात सापडतात. कधी ते वाट चुकतात तर कधी त्यांची नजर भिरभिरते अन् डोकं गरगरायला लागतं, तेव्हा त्यांच्या मदतीला सह्याद्रीची २२ वर्षीय 'वाघीण' तनया दयानंद कोळी धावून जाते अन् धैर्याचा हात देत सुरक्षित 'रेस्क्यू' करते.

गिर्यारोहण म्हणजे फक्त शिखर गाठणं नाही. तिथे संघभावना, धैर्य, आणि संकटसमयी जीव वाचवण्याचं कसबही तितकंच महत्त्वाचं असतं. गिर्यारोहणातील बचाव कार्यात खांद्याला खांदा लावून तनया आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत 'नाशिक क्लाइंबिंग अॅन्ड रेस्क्यू असोसिएशन'चा उद्देश यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. वयाच्या पाचव्या वर्षापासून तिला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा अनुभव वडिलांसोबत मिळू लागला. तिने वयाच्या सोळाव्या वर्षीच स्वतःचं दोरखंडावरील नियंत्रण मिळवत मोहिमेत भाग घेण्यास सुरुवात केली. प्रस्तरारोहणात पाय रोवले. पहिनेचा नवरा-नवरी, संडे वन-टू, वानरलिंगी, ड्युक्सनोज, तैलबैलची इनर वॉल, हरिहरचा स्कॉटिश कडा यांसारख्या सह्याद्रीतील कठीण कड्यांवर तिने यशस्वी चढाई केली.

मुलींनी गिर्यारोहणात आणि रेस्क्यू 66 मोहिमांमध्येही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी व्हायला हवे. गिर्यारोहण असो किंवा सह्याद्रीतील बचावकार्य असो एकजुटीने, सुरक्षिततेचे मापदंड पाळून आणि संघभावनेने केले तर काहीच कठीण नाही. एखाद्या व्यक्तीचा जीव वाचविण्यापेक्षा दुसरे असे कुठलेही यशोशिखर असू शकत नाही. तनया कोळी, युवा गिर्यारोहक


कोकणकड्यावर अवघड 'परीक्षा'
गिर्यारोहकांची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या हरिश्चंद्र गडाच्या कोकणकड्यावरून 'रिकव्हर' मोहिमेसाठी तळपत्या उन्हाची पर्वा न करता गणेश गीध यांच्या नेतृत्वाखाली कड्यावरून दोरखंडाच्या सहाय्याने खाली उतरण्याचे धाडस केले होते, दरीत एका लेजवर विखुरलेले मृतदेह बघून तिचेही हृदय हेलावून गेले; मात्र तिने जिद्द व धैर्याने अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने त्या युवकाचा मृतदेह स्ट्रेचरवर बांधून सुरक्षित वर पोहोचवून अवघड परीक्षा उत्तीर्ण केली होती. तनया नाशिकमध्ये नवोदितांना रेस्क्यू व रिकव्हरीचे सध्या धडे देत आहेत.

रेस्क्यू, रिकव्हरीच्या मोहिमा यशस्वीपणे पार
जेव्हा तनयाने गिर्यारोहणापलीकडे जाऊन मानवी जीवनासाठी स्वतःला झोकून दिले तेव्हा तिचा अधिक कस लागला. तिने बेसिक एडव्हान्स माऊंटेनिअरिंगचा अभ्यासक्रम हिमाचल प्रदेशमधील एका संस्थेतून पूर्ण केला. दुगारवाडी धबधबा येथे बुडलेल्या एका व्यक्तीच्या मृतदेहाचा शोध असो किंवा मायना डोंगरावर अडकलेल्या एका महिलेला रेस्क्यू करणे असो, तिने अशा रेस्क्यू, रिकव्हरीच्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *