कल्याणमध्ये उभारले जाणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे देशातील पहिले भव्य स्मारक; ऐतिहासिक जहाजांच्या प्रतिकृती अन् नौदलाचा इतिहासणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली सागरी सामर्थ्याची आणि अफाट दूरदृष्टीची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कल्याण पूर्वेतील कचोरे-नेतीवली टेकडी परिसरात देशातील पहिले भव्य असे 'छत्रपती शिवाजी महाराज आरमार स्मारक' (Navy Memorial) उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या माध्यमातून शिवरायांच्या आरमाराचा इतिहास आणि सागरी शौर्य जगासमोर आणले जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि सागरी व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शक्तिशाली आरमार (नौदल) उभे केले होते. महाराजांच्या या सागरी दूरदृष्टीचा आणि सामर्थ्याचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी हे स्मारक केवळ एका पुतळ्यापुरते मर्यादित न ठेवता अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विस्तृत स्वरूपात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावित स्मारकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आरमाराची निर्मिती, जहाजांची रचना, विविध नौकांचे प्रकार, ऐतिहासिक सागरी मोहिमा आणि त्या काळातील मजबूत नौदल सामर्थ्य याची सविस्तर माहिती नागरिकांना व पर्यटकांना अनुभवता येणार आहे.

या स्मारकाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कल्याण पूर्वेकडील कचोरे-नेतीवली टेकडी परिसरातील उपलब्ध जागेचा स्मारकासाठी योग्यतेच्या दृष्टीने अभ्यास करण्यात येत आहे. याशिवाय आरमारातील विविध ऐतिहासिक जहाजांच्या भव्य प्रतिकृती (Replicas) या परिसरात उभारण्यात येणार आहेत, जेणेकरून शिवकालीन नौदल तंत्रज्ञानाची आणि इतिहासाची प्रत्यक्ष अनुभूती घेता येईल. यासंदर्भात स्थानिक प्रशासनासोबत महत्त्वाची आढावा बैठक पार पडली असून, स्मारकाची योग्य संकल्पना, आकर्षक स्वरूप, आवश्यक बाबी आणि पुढील नियोजनाच्या सविस्तर सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

या ऐतिहासिक आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कल्याण शहराच्या वैभवात भर पडणार असून, शिवप्रेमींमध्ये आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे हे देशातील पहिलेच आरमार स्मारक ठरणार असल्यामुळे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

 



महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *