पुणे: मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांच्या नियोजित आंदोलनाला तूर्त ब्रेक; २ ऑक्टोबरचा सत्याग्रह तात्पुरता स्थगित

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) मनमानी कारभाराविरोधात, परीक्षांमधील घोळ आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यात येत्या २ ऑक्टोबर रोजी पुकारण्यात आलेले मोठे 'सत्याग्रह' आंदोलन अखेर तूर्त स्थगित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमपीएससी विद्यार्थी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळादरम्यान मंत्रालयात पार पडलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीत विद्यार्थ्यांच्या बहुतांश प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेत अनेक ठोस व दिलासादायक आश्वासने दिल्यानंतर, विद्यार्थी प्रतिनिधींनी हे आंदोलन तूर्तास मागे घेत असल्याचे जाहीर केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक बैठक: गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी राज्यभरातून आवाज उठवत होते. याच पार्श्वभूमीवर पुण्यात २ ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणावर आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केले होते. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा होऊन शासनाकडून खालीलप्रमाणे महत्त्वाचे निर्णय व आश्वासने देण्यात आली:

  • सचिवांची तडकाफडकी बदली: एमपीएससीच्या सचिवांची लवकरच तडकाफडकी बदली करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

  • अध्यक्षांची न्यायालयीन चौकशी: एमपीएससी अध्यक्षांच्या कारभारासंदर्भात संविधानाच्या कलम ३१७ नुसार आणि त्रयस्थ न्यायाधीशांमार्फत ३ महिन्यांत चौकशी करून त्या निष्कर्षाच्या आधारावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

  • परीक्षा ऑफलाईनच होणार: विद्यार्थ्यांची मुख्य मागणी असलेल्या परीक्षांच्या पद्धतीबाबत स्पष्ट करण्यात आले की, आगामी सर्व एमपीएससी परीक्षा या पूर्वीप्रमाणेच 'ऑफलाईन' पद्धतीनेच घेतल्या जातील. विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याशिवाय यात कोणताही बदल केला जाणार नाही.

  • विक्रमी जागांची भरती: आजवरचे सर्व रेकॉर्ड तुटतील इतक्या मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा भरण्यात येतील. तसेच ३ जानेवारीच्या गट 'क' परीक्षेच्या अनुषंगाने जागावाढीची विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्यात आली आहे.

  • एकल कार्ड प्रणाली (Single Card System): विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एकाच 'सिंगल कार्ड'वर सर्व प्रकारच्या परीक्षा देता येतील अशी अद्यावत आणि पारदर्शक यंत्रणा उभारण्यात येणार असून, ती अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिली जाईल. वारंवार कागदपत्रे जोडण्याचा त्रास यामुळे वाचणार आहे.

  • तीन वर्षांच्या जागा एकाच वेळी जाहीर: यापुढे पुढील ३ वर्षांच्या रिक्त जागांचे नियोजन एकाच वेळी जाहीर केले जाईल आणि सेवानिवृत्त होणाऱ्या जागांवर एक वर्ष आधीच भरती प्रक्रियेची तयारी सुरू केली जाईल.

विद्यार्थ्यांकडून आंदोलन स्थगितीची घोषणा: मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या सर्व ठोस आणि सकारात्मक आश्वासनांमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थी प्रतिनिधी नितीन अंधळे आणि इतर शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक अत्यंत सकारात्मक झाल्याचे जाहीर करत, येत्या २ ऑक्टोबर रोजी पुण्यात नियोजित केलेले सत्याग्रह आंदोलन तूर्त तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा केली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *