बारामतीतील गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील हावभाव अन् बीभत्स नृत्य; पोलिसांनी सात जणांवर आवळला कायदेशीर बडगा, गुन्हा दाखल

वडगाव निंबाळकर (बारामती, जि. पुणे - विशेष वृत्त: चिंतामणी क्षीरसागर): लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणे, अश्लील हावभाव करणे आणि बीभत्स नृत्य करणाऱ्यांवर आता पोलीस प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक हद्दीतील माळशिकारेवाडी परिसरात बुधवारी (ता. २३) रात्री सव्वानऊच्या सुमारास गणेश विसर्जन मिरवणुकीत नियम धाब्यावर बसवून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत आणि शिस्तीत पार पाडावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून आधीच कडक सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आदेशांचे व नियमांचे उल्लंघन करत काही तरुणांनी मिरवणुकीदरम्यान डॉल्बी आणि लाऊडस्पीकरच्या तालावर सार्वजनिक ठिकाणी अत्यंत अश्लील हावभाव करत बीभत्स नृत्य केले. या कृत्यामुळे मिरवणुकीतील सामाजिक वातावरण व पावित्र्य बिघडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलली.

याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हे नोंदवले आहेत. सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली संस्कृतीला कलंक लावणारे गैरवर्तन सहन केले जाणार नाही आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा स्थानिक पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या घटनेमुळे बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *