पुणे: हायप्रोफाइल 'द न्यू पूना क्लब'च्या किचनमध्ये जिवंत झुरळे अन् उंदराची विष्ठा; FDA च्या धडक कारवाईत परवाना तत्काळ रद्द!

पुणे: उच्चभ्रू वर्तुळात अत्यंत प्रतिष्ठित आणि लोकप्रिय ओळख असलेल्या कॅम्प परिसरातील 'द न्यू पूना क्लब'वर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई करत मोठा दणका दिला आहे. क्लबच्या स्वयंपाकघरात अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने क्लबचा अन्न परवाना तत्काळ निलंबित केला आहे. ज्या ठिकाणी दररोज शेकडो उच्चभ्रू नागरिक आणि सभासद जेवणासाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी येतात, त्याच ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ सुरू असल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार या अचानक केलेल्या तपासणीमुळे उघडकीस आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने 'द न्यू पूना क्लब'च्या किचनची अचानक झाडाझडती घेतली, तेव्हा तिथे अत्यंत भयानक आणि अस्वच्छ वास्तव समोर आले. अन्न शिजवले जात असलेल्या जागेवर आणि खाद्यान्नाची साठवणूक करण्यात येणाऱ्या कपाटांमध्ये जिवंत झुरळे आणि किडे मोकाट फिरताना आढळले. स्वयंपाकघराच्या फरशीवर उंदराची विष्ठा पडलेली होती, ठिकठिकाणी सांडपाणी साचले होते आणि भिंतींसह अन्न शिजवण्याचे ओटे तेलकट व घाणेरड्या थरांनी माखले होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या रेफ्रिजरेटरमध्ये (फ्रीज) ग्राहकांसाठी अन्नपदार्थ ठेवले जातात, त्याच्या अगदी लागूनच अत्यंत अस्वच्छ शौचालय आढळून आले, ज्यामुळे अन्ना दूषित होण्याचा आणि आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याचा मोठा धोका होता.

 

 

गणेशोत्सव आणि आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन पुणे एफडीएने संपूर्ण जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मिठाई, खवा, तेल आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी हे पथक सतत मैदानात उतरून कठोर कारवाई करत आहे. या मोहिमेत पुणे शहर, उपनगरे तसेच ग्रामीण भागातील अनेक नामांकित हॉटेल्स, मिठाईची दुकाने, बेकऱ्या आणि रेस्टॉरंट्सची कसून तपासणी करण्यात येत आहे. नियमांची पायमल्ली करणाऱ्या अशा आस्थापनांवर प्रशासनाने कडक बडगा उगारल्यामुळे पुणे शहरातील अन्न व्यावसायिक आणि हॉटेलचालकांचे धाबे दणाणले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही नामवंत किंवा मोठ्या आस्थापनेची कोणतीही हयगय केली जाणार नाही आणि ही कडक मोहीम अशीच पुढेही सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *