Nandurbar : पुष्पा स्टाईल तस्करी उघड! भाजीच्या कॅरेटमधून ५ कोल्हे, १९० तितर, ९५ पोपट जप्त

Nandurbar : महाराष्ट्रातून गुजरातमध्ये भाजीच्या कॅरेटच्या आडून वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा नंदुरबार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, वनविभाग आणि विसरवाडी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरत-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदी केली. दरम्यान, मालेगावहून गुजरातच्या दिशेने जाणारा एक आयशर ट्रक संशयावरून थांबवण्यात आला. तपासणीदरम्यान ट्रकच्या मागील बाजूस भाजीचे कॅरेट ठेवून त्यांच्या आडून पिंजऱ्यांमध्ये वन्य प्राणी लपवण्यात आल्याचे आढळून आले.

या कारवाईत पोलिसांनी ५ भारतीय कोल्हे, १९० तितर आणि ९५ जंगली पोपट जप्त केले असून तस्करी करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक हेमंत पाटील (स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार) यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास या तस्करीबाबत माहिती मिळाल्यानंतर तात्काळ सापळा रचण्यात आला आणि ट्रक अडवून ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या वन्य प्राण्यांची तस्करी नेमकी कोणासाठी आणि कशासाठी केली जात होती, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “Nandurbar : पुष्पा स्टाईल तस्करी उघड! भाजीच्या कॅरेटमधून ५ कोल्हे, १९० तितर, ९५ पोपट जप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *