पुणे: गांधींना भेटायचंय...? बुधवार-गुरुवार सोडून या..! 'हरिजन'साठी बापूंचे दोन्ही दिवस होते राखीव

पुणे: महात्मा गांधी यांना भेटण्यासाठी वेळ मागायची, पण बुधवार आणि गुरुवार वगळून ! हे दोन दिवस त्यांनी एका साप्ताहिकासाठी राखून ठेवले होते. येरवडा कारागृहातून न. चिं. केळकर यांना ५ फेब्रुवारी १९३३ रोजी लिहिलेल्या पत्रात गांधींजीनी भेटीची वेळ ठरवताना ही अट घातली होती. त्याचे कारण म्हणजे पुण्यातून सुरू होणारे 'हरिजन' साप्ताहिक. त्याच्या कामासाठी आठवड्यातले दोन पूर्ण दिवस लागणार होते. कारागृह प्रशासनाची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी रविवारही टाळण्यास सांगितले होते. यातून गांधीजी केवळ संदेश देणारे नेते नव्हते तर साप्ताहिकासाठी वेळ राखून ठेवणारे, संपादकाची व्यवस्था करणारे आणि प्रकाशनाच्या आर्थिक गणिताचा विचार करणारे कार्यकर्तेही होते. विशेष म्हणजे, त्यांच्या पत्रकारितेला छापील रूप मिळाले ते पुण्यात. गांधीजी आणि पुणे नात्याचा हा धागा भेटीच्या एका पत्रापासून सुरू होतो आणि एक आण्याच्या अंकापर्यंत पोहोचतो.

महात्मा गांधी यांनी नरसिंह चिंतामण (तात्यासाहेब) केळकर यांना लिहिलेले पत्र अस्पृश्यता निवारण मोहिमेतील सहकार्या संदर्भातील होते. 'गांधीपीडिया' या संकेतस्थळावर हे पत्र आजही उपलब्ध आहे. महात्मा गांधी, न. चिं. केळकर आणि 'हरिजन' साप्ताहिकाचा संदर्भ हा भारताच्या सामाजिक सुधारणा आणि अस्पृश्यता निवारण चळवळीशी जोडला गेलेला होता. १९३३ च्या दरम्यान महात्मा गांधींनी अस्पृश्यतेविरुद्ध मोठे आंदोलन उभारले होते, ज्यामध्ये महाराष्ट्रातील आघाडीचे नेते आणि लोकमान्य टिळकांचे सहकारी न. चिं. केळकर यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

संपादकाने सोडले होते चांगल्या कमाईचे काम
जानेवारी १९३२ मध्ये गांधीजींच्या अटकेनंतर 'यंग इंडिया'चे प्रकाशन बंद पडल्याने, त्याच्या जागी 'हरिजन' सुरू करण्याचा विचार पुढे आला. सर्व्हट्स ऑफ इंडिया सोसायटीचे ए. एन. पटवर्धन यांना साप्ताहिकाचे अधिकृत मुद्रक आणि प्रकाशक म्हणून घोषित करण्यात आले. आर. व्ही. शास्त्री साप्ताहिकाचे पहिले संपादक होते. शास्त्री यांनी संपादित केलेला 'हरिजन'चा पहिला इंग्रजी अंक ११ फेब्रुवारी १९३३ रोजी पुण्यातून प्रसिद्ध झाला. छपाई आर्यभूषण प्रेसमध्ये झाली. या नावांमागेही एक गोष्ट होती. शास्त्री यांनी कलकत्त्यातील चांगले उत्पन्न देणारे भागीदारीतील काम सोडून माफक निर्वाह वेतनावर सामाजिक कार्य स्वीकारले होते. पुण्यातून साप्ताहिक काढण्याचे ठरल्यानंतर गांधींनी त्यांच्याकडे संपादकीय सेवांची मागणी केली; त्याला शास्त्री यांच्याकडून तत्पर प्रतिसाद मिळाला. यात गांधीजी यांची विशिष्ट भूमिका संपादक शास्त्री यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट होते. ते म्हणतात, साप्ताहिकासाठी ते लेखन करतील आणि त्यांच्या धोरणाला दिशा देतील. साप्ताहिकाचे संपादक जरीवेगळे असले, तरी या प्रकाशनात गांधींचा थेट सहभाग होता.

त्यावेळी 'हरिजन' या साप्ताहिकाची किंमत होती एक आणा. देशांतर्गत वार्षिक वर्गणी टपालासह चार रुपये आणि टपालाशिवाय तीन रुपये होती. वर्गणीदारांनी पटवर्धन यांच्याकडे नावे पाठवावीत आणि वर्गणी पैसे किंवा टपाल तिकिटांत नावे द्यावी, अशी सूचना करण्यात आली होती. सामाजिक उद्देशासाठी निघणारे साप्ताहिक आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहावे, ही गांधी यांची अपेक्षा सुरुवातीपासून होती.

जाहिराती नाहीत; मग साप्ताहिक चालवायचे कसे? या प्रश्नाचे उत्तर गांधींच्या आणखी एका पत्रात मिळते. ३१ मार्च १९३३ रोजी होरेस जी. अलेक्झांडर यांना त्यांनी लिहिले होते की, जाहिराती नाकारणे, साप्ताहिक स्वावलंबी ठेवणे आणि स्वतःची भूमिका सविस्तर मांडणे. हे सारे एकत्र सांभाळणे कठीण होते. तरीही 'हरिजन' जवळजवळ सुरुवातीपासून स्वावलंबी करता आल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला होता.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *