साताऱ्यात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे अन् ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे कडक नजर; मृत चिमुकल्याच्या वडिलांना १० लाखांची तात्काळ आर्थिक मदत जाहीर

सातारा: तालुक्यातील न्हाळेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात अडीच वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. या गंभीर घटनेची दखल घेत वनविभागाने आक्रमक पवित्रा घेतलेल्या ग्रामस्थांची समजूत काढत बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. घटनेच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून, बिबट्याचा माग काढून त्याला पकडण्यासाठी विशेष पिंजरे लावण्यात आले आहेत तसेच ड्रोनच्या साह्याने परिसरावर सतत नजर ठेवली जात आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, न्हाळेवाडी येथे रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झालेला असताना अंधाराचा फायदा घेऊन घराबाहेर आलेल्या अडीच वर्षांच्या जय संदीप खंडागळे या चिमुकल्याला दबा धरून बसलेल्या बिबट्याने उसाच्या शेतात ओढून नेऊन त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या अमानुष घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आणि कुटुंबीयांनी वनविभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला होता. जोपर्यंत दोषींवर योग्य कारवाई होत नाही आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत मृत बालकाचे पार्थिव ताब्यात घेण्यास ग्रामस्थांनी नकार दिला होता.

या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासकीय अधिकारी, पोलीस व वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना सुरक्षेची पूर्ण खात्री दिली. तसेच संभाव्य मानवी वस्तीवरील धोका टाळण्यासाठी आणि बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यासाठी परिसरात तीन ते चार ठिकाणी ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरे लावण्यात आले आहेत. याशिवाय, पाच किलोमीटर परिघात ड्रोनच्या माध्यमातून कसून शोधमोहीम राबवली जात आहे.

दरम्यान, या अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी घटनेमुळे उद्धवस्त झालेल्या कुटुंबाला शासनाकडून तातडीने आधार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, मृत चिमुकल्याचे वडील संदीप खंडागळे यांना शासनाच्या वतीने तात्काळ १० लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली असून, उर्वरित १५ लाखांची मदत लवकरात लवकर अदा केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वनविभागाच्या या शोधमोहिमेमुळे आणि तातडीच्या उपाययोजनांमुळे या परिसरातील नागरिकांमधील भीतीचे वातावरण कमी होऊन बिबट्या लवकरच जाळ्यात अडकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *