दापोलीत प्रकल्पांविरोधात संतापाचा लाव्हा फुटला! दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट मायनिंग आणि देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्यासाठी ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

रत्नागिरी: कोकणातील पर्यावरणसंपन्न आणि निसर्गरम्य दापोली तालुक्यामध्ये एकापाठोपाठ एक येणाऱ्या वादग्रस्त व महाप्रकल्पांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. दापोली तालुक्यामध्ये प्रस्तावित असणारे दाभोळ-आघारी (भिवबंदर) येथील मेगा अणुऊर्जा प्रकल्प, चिखलगाव येथील बॉक्साइट मायनिंग (खणण प्रकल्प) आणि देवके नवेनगर प्रकल्प या तिन्ही विनाशकारी प्रकल्पांना कडाडून विरोध दर्शवत हजारो ग्रामस्थांनी दापोली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या प्रकल्पांमुळे या परिसरातील शेती, फलबागायती, पिण्याच्या पाण्याची स्रोते, पर्यावरण आणि पारंपारिक मत्स्यव्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, अशी भीती यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली.

दापोली तालुक्यात शासनाच्या वतीने आणि विविध ऊर्जा कंपन्यांच्या माध्यमातून हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणले जात आहेत. मात्र, हे प्रकल्प स्थानिक जनतेच्या माथी मारताना कोणालाही विश्वासात घेतले गेले नाही, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अणुऊर्जा प्रकल्पासारख्या महाप्रकल्पांमुळे कोकणातील निसर्गाचे संतुलन बिघडेल आणि येथील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होईल. तसेच चिखलगाव भागातील बॉक्साइट मायनिंगमुळे जमिनीची धूप होऊन डोंगराळ भाग आणि पाण्याचे स्त्रोत धोक्यात येतील, तर देवके नवेनगर प्रकल्पामुळे स्थानिक भूमिपुत्रांना विस्थापित व्हावे लागेल, अशी भीती आंदोलक शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी व्यक्त केली.

तहसील कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने महिला, शेतकरी, बागायतदार, मच्छीमार आणि ग्रामस्थ मोठ्या जोशात सहभागी झाले होते. शासनाने स्थानिकांच्या भावनांचा व हिताचा विचार न करता हे प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र स्वरूपाचा लढा उभारला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. जोपर्यंत हे तिन्ही प्रकल्प पूर्णपणे रद्द केले जात नाहीत, तोपर्यंत आमचा हा संघर्ष सुरूच राहील, अशी आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. या धडक मोर्च्यामुळे दापोली तालुक्यात वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकल्पांच्या भवितव्याबद्दल मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे.

 



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *