मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!

मुंबई: महानगरपालिकेने (BMC) नागरिकांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा विचार करत आकाशात उडणाऱ्या रॉकेट आणि तत्सम फटाक्यांच्या वापरावर स्पष्ट बंदी घातली होती. असे असतानाही, दिवाळीच्या सणात अनेक मुंबईकरांनी या आदेशाला फारसा प्रतिसाद न देता बंदीचे आदेश धाब्यावर बसवले आणि रॉकेट उडवून दणक्यात दिवाळी साजरी केल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला होता, तरीही प्रत्यक्षात शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर रॉकेट आकाशात झेपावताना दिसले.

मुंबई महानगरपालिकेने ९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रात्री १२ वाजेपर्यंत आकाशात उडणारे रॉकेट आणि तत्सम उच्च-जोखीम फटाक्यांच्या वापरावर कडक प्रतिबंध घातला आहे. निवासी इमारती, इमारतींच्या गच्चीवर (टेरेस), बाल्कनी, मोकळी अंगणे, वाहनतळ (पार्किंग एरिया) तसेच झोपडपट्टी परिसरासह मुंबईतील सर्व सार्वजनिक व खाजगी ठिकाणी ही बंदी लागू करण्यात आली आहे. अग्निसुरक्षा आणि संभाव्य अपघात टाळणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.

मात्र, या बंदी आदेशाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत झाली, यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी मुंबईत एकाच दिवसात आगीच्या तब्बल १४२ घटनांची नोंद झाली होती. त्या अत्यंत धक्कादायक बाबी, म्हणजे यातील तब्बल १३७ घटना केवळ फटाक्यांमुळे घडल्या होत्या. याचा अर्थ शहरात घडलेल्या एकूण आगीच्या घटनांपैकी तब्बल ९६ टक्के आगी या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे लागल्या होत्या. या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी नागरिकांना फटाके फोडताना अत्यंत काळजी घेण्याचे आणि सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले होते. परंतु, या आवाहनाकडे दुर्लक्ष करत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी सुरूच ठेवली.

नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दुसरीकडे, प्रशासनाकडून अचानक लादण्यात आलेल्या या बंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. फटाक्यांचे उत्पादन, वाहतूक, साठा आणि खरेदी-विक्रीची व्यावसायिक प्रक्रिया ही दिवाळीच्या दोन ते चार महिने आधीपासूनच सुरू होत असते. अशा वेळी ऐन सणाच्या तोंडावर किंवा अगदी ऐनवेळी अचानक बंदीचे आदेश लादल्याने हा प्रश्न कसा सुटणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. काही नागरिकांनी या निर्णयाची तुलना गणेशोत्सवाच्या अवघ्या दोन दिवसआधी पर्यावरणपूरक मूर्तींसंदर्भात येणाऱ्या अचानक नियमांशी केली आहे.

दरम्यान, मुंबईत सणासुदीच्या काळात घडलेल्या आगीच्या घटनांचा सविस्तर घटनाक्रम खालीलप्रमाणे आहे:

  • ८ नोव्हेंबर: मुंबईत एकाच दिवसात आगीच्या एकूण १४२ घटना घडल्या, त्यापैकी तब्बल १३७ दुर्घटना या केवळ फटाक्यांमुळे उद्भवल्या (एकूण घटनांपैकी सुमारे ९६ टक्के आगी फटाक्यांमुळे).

  • ९ नोव्हेंबर: मालवणी परिसरात एका फटाक्यांच्या दुकानाला अचानक भीषण आग लागली. या आगीतील तीव्र स्फोटामुळे दुकानाचा स्लॅब कोसळून एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला.

  • १० नोव्हेंबर: प्रतीक्षानगर भागात लागलेल्या भीषण आगीत ७ ते ८ झोपड्या जळून खाक झाल्या, तसेच या दुर्घटनेत तीन सिलिंडरचे मोठे स्फोट झाल्याची नोंद झाली.

प्रशासन आणि पालिकेने सुरक्षेसाठी पावले उचलली असली, तरी नागरिकांचे सहकार्य आणि प्रशासकीय नियोजन यामध्ये समन्वय साधण्याचे मोठे आव्हान अद्यापही कायम असल्याचे या संपूर्ण प्रकरणावरून स्पष्ट होत आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *