कर्जतमधील पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पांमुळे ११ हजार एकर जमीन व जंगले धोक्यात; सह्याद्रीच्या अस्तित्वावर मोठे संकट

सह्याद्रीची पर्वतरांग ही केवळ एक डोंगररांग नसून ती समृद्ध जैवविविधता आणि आदिवासी-ग्रामस्थांच्या जगण्याचा मुख्य आधार आहे. मात्र, सध्या वेगाने विस्तारत चाललेल्या पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पांच्या (Pumped Storage Hydroelectric Projects) जाळ्यामुळे सह्याद्रीच्या अस्तित्वावर आणि पर्यावरणावर मोठे संकट ओढवले आहे. कर्जत तालुक्यामध्ये प्रस्तावित असलेल्या विविध जलविद्युत प्रकल्पांमुळे तब्बल ११ हजार एकर जमीन बाधित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे स्थानिक स्तरावर तीव्र चिंता व्यक्त होत आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, या प्रकल्पांसाठी डोंगर मोठ्या प्रमाणावर पोखरणे, विस्तीर्ण जलाशय उभारणे आणि जंगलांमधून अवजड वाहनांसाठी व प्रकल्पांसाठी रस्ते तयार करण्याचे काम केले जात आहे. कर्जत तालुक्यात एकापाठोपाठ एक तब्बल सात प्रकल्प लादण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने टोरंट व टाटा जलविद्युत प्रकल्प, पोशीर, शिलार, कोंढाणे, पाली-भूतिवली धरणे आणि अदानी पॉवर हब यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांच्या उभारणीमुळे परिसरातील जंगले, नद्या, पाणवठे आणि आदिवासी समुदायांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, अशी भीती कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समितीचे एड. कैलास मोरे यांनी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, या प्रकल्पांतर्गत होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीवरून आणि खाजगी कंपन्यांच्या सहभागावरून सध्या राजकारण देखील चांगलेच तापले आहे. प्रकल्पासाठी हजारो झाडे तोडली जात असल्याचा दावा करत विरोधक आणि पर्यावरणप्रेमींनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, दुसरीकडे शासनाकडून हा प्रकल्प महाराष्ट्राच्या ऊर्जेच्या दृष्टीने कसा महत्त्वाचा आहे, याविषयी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. स्वच्छ ऊर्जेची गरज भागवण्यासाठी आणि राज्याच्या विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हे प्रकल्प आवश्यक असल्याचा दावा शासन आणि प्रकल्पाच्या बाजूने केला जात आहे.

तथापि, विकासाच्या नावाखाली निसर्गाचा संहार रोखला जावा आणि स्थानिक आदिवासी व ग्रामस्थांचे अधिकार सुरक्षित राहावेत, यासाठी पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांकडून सातत्याने विरोध दर्शवला जात असून, या प्रकल्पांच्या दुष्परिणामांमुळे सह्याद्रीच्या कुशीतील पर्यावरण संतुलन बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *