Nashik : अशोक खरात प्रकरणात नवे वळण, तांत्रिक तपासातून दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांची नावे समोर

Nashik : बहुचर्चित अशोक खरात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून तपासाचा फास अधिक आवळताना दिसत आहे. एका बड्या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आधीच चर्चेत असताना, आता पोलिस दलातील दोन वरिष्ठ महिला अधिकारीही तपासाच्या कक्षेत आल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका पोलीस उपआयुक्त आणि एका सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांचा अशोक खरात याच्याशी संपर्क असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. इच्छित ठिकाणी बदली किंवा पोस्टिंग मिळवण्यासाठी त्यांनी खरातची मदत घेतल्याची चर्चा असून, त्या अनुषंगाने तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे.

तसेच, संबंधित अधिकारी आणि खरात यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत का, याचाही तपास केला जात आहे. तांत्रिक तपासातून या महिला अधिकाऱ्यांच्या नावांचे धागेदोरे समोर आल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. या प्रकरणात प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हितसंबंध उघड झाल्यास राज्याच्या गृहविभागात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, खरातविरोधात दाखल गुन्ह्यांच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून आज (७ एप्रिल) सायंकाळी महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत प्रकरणासंदर्भात महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वी सरकारवाडा पोलीस ठाण्यात महिलांच्या लैंगिक शोषणासंदर्भात गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ स्तरावर विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले. या पथकाकडून तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आतापर्यंत काय प्रगती झाली, तसेच मुख्य संशयितांविरोधात कोणते ठोस पुरावे मिळाले, याबाबतची माहिती आजच्या पत्रकार परिषदेत समोर येण्याची शक्यता आहे.

सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे ही पत्रकार परिषद होणार असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना या परिषदेनंतर अधिकृत स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *