पुणे: राजकारणात काहीही होऊ शकते, ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदेसेनेच्या नेत्याचे मोठे विधान"

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या घडामोडींमुळे मोठी चलबिचलन पाहायला मिळत आहे. यातच शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी राजकारणाबाबत एक अत्यंत सूचक आणि मोठे विधान केले आहे. राजकारणात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते आणि परिस्थितीनुसार समीकरणे बदलू शकतात, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघेही भविष्यात एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांचे एकाच मंचावर येणे आणि तुटलेला संवाद पुन्हा जोडण्याचा प्रयत्न होणे यावर भाष्य करताना धंगेकर म्हणाले की, राजकारणात नेहमी संवाद असायला हवा. विरोधकांना संपवण्याचे राजकारण राज्य आणि देशाने पाहिले आहे, मात्र कालच्या कार्यक्रमामुळे संवाद पुन्हा जोडण्याचे काम झाले असून यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळू शकते.

उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांचे रक्त आहेत, त्यामुळे नेमके कुठे वाकायचे आणि कुठे उभे राहायचे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. तसेच एकनाथ शिंदे हे देखील शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत. जे वरवर दिसते ते नेहमीच खरे असते असे नाही. प्रत्येकाची राजकीय भूमिका जरी वेगळी असली, तरी राजकारणात कधीही काहीही घडू शकते हे आता लपून राहिलेले नाही. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि वारसा जपण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादावर आणि पराभवाच्या आत्मचिंतनावरही त्यांनी रोखठोक भाष्य केले. शिक्षकांची आणि पदवीधरांची नाराजी ही थेट सरकारच्या कारभाराविरोधात होती, असे सांगत त्यांनी जनतेचा कौल नम्रपणे स्वीकारला पाहिजे, असे म्हटले. तसेच, राज्याचे नेतृत्व बदलण्याबाबत भाष्य करताना त्यांनी पूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २०० पेक्षा जास्त आमदार निवडून आल्याची आठवण करून देत शिंदेंकडेच प्रभावी नेतृत्वाची धुरा पुन्हा दिली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका देखील मांडली आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *