शिंदे-फडणवीसांची प्रभादेवीमधील शिंदे गट- शिवसेना वादावर चर्चा? ‘वर्षा’वर रात्री उशिरा पार पडली मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी रात्री उशिरा महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावर दीड ते पावणे दोन तास शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली. गणपती विसर्जनाच्यावेळी प्रभादेवी परिसरात ठाकरे व शिंदे गटात झालेल्या वादावर या वेळी चर्चा झाल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. त्याचप्रमाणे पोलिसांच्या रखडलेल्या बदल्यांचा विषयावरही या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यामधील पोलिसांच्या रखडलेल्या बदल्या, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रभादेवीमध्ये झालेला वाद आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था या विषयांवर यावेळी शिंदे आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असून त्यांनी प्रभावदेवी प्रकरणाबरोबरच पोलिसांच्या बदल्यांच्या विषयी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. पोलिसांच्या बदल्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल अशी शक्यता या बैठकीनंतर व्यक्त केली जात आहे.

मागील दहा दिवसांमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अनेक ठिकाणी भेट देत होते. मात्र या कालावधीमध्ये राजकीय चर्चा आणि घडामोडी मागे पडल्या होत्या. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ही बैठक झाली. या बैठकीमधील महत्त्वाचा विषयांमध्ये मुंबई पोलिसांच्या बदल्या हा देखील होता. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या करणं कठीण होईल. त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर मार्ग लावण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. मुंबईवर मागील अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंचं वर्चस्व आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांच्या बदल्या करताना शिंदे गट कशाप्रकारे अधिकारी नियुक्ती करणार याकडे लक्ष लागलेलं आहे.

या बैठकीमध्ये शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये प्रभादेवी येथे झालेल्या वादावरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांदरम्यान झालेल्या वादामध्ये पोलीस ठाण्याच्या आवारात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला असून त्याप्रकरणी शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपती विसर्जनाच्यावेळी प्रभादेवी परिसरात ठाकरे व शिंदे गटात झालेल्या वादातून शनिवारी ठाकरे गटातील शिवसैनिकांनी शिंदे गटातील शाखाप्रमुखाला मारहाण केली. या वेळी झालेल्या वादानंतर सुमारे १२ शिवसैनिकांसह इतर २५ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याप्रकरणी विभागप्रमुख महेश सावंत व चार शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

शिंदे गट आणि शिवसेनेदरम्या झालेल्या वादानंतर पोलीस स्थानकामध्ये जी तक्रार करण्यात आली आहे ती संतोष तेलवणे शिंदे गटाच्या शाखा क्रमांक१९४ चे शाखाप्रमुख आहेत. त्यांनी दादर पोलीस ठाण्यात मारहाणीप्रकरणी तक्रार दिली. या तक्रारीनुसार दादर पोलिसांनी ठाकरे गटाचे माहीम विभागप्रमुख महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत, विनायक देवरुखकर, प्रथमेश बीडू, विपुल ताटकर, यशवंत विचले, विजय पांडे, चंदन साळुंखे, संजय सावंत, दुतेश रहाटे, रवी पंडय़ाचील व इतर  २० ते २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे. या वेळी तेलवणे यांनी त्यांच्या दोन सोनसाखळय़ा हिसकावून पलायन केल्याचा आरोप शिवसैनिकांवर केला होता. त्यामुळे अंतर्गत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी महेश सावंत व इतर चार पोलिसांनी शिवसैनिकांना अटक केली. पण या प्रकरणातील भादंवि कलम ३९५ कलम हटवल्यामुळे सर्व पाच शिवसैनिकांना पोलीस ठाण्यातूनच जामीन देण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply