मुंबई: आवाज खाली करा…; घरी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर नवनीत राणा भडकल्या

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा असल्याचे कारण देत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा  यांनी 'मातोश्री'वर जाणार नसल्याचं जाहीर केलं. यानंतर आज, दुपारच्या सुमारास नाट्यमय घडामोडी घडल्या. खार येथील राणा दाम्पत्याच्या घरी दुपारी पोलीस अधिकारी पोहोचले. त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याच्या तयारीत पोलीस अधिकारी (Mumbai Police) आले होते. मात्र, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. यावेळी नवनीत राणा या त्यांच्याशी चर्चा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर भडकल्याचे व्हिडिओत दिसत होते. आवाज खाली करा, आवाज खाली करा...आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, तुम्ही निघून जा, असं त्या अधिकाऱ्याशी बोलताना दिसत होत्या.

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचं कारण देत हनुमान चालीसा न म्हणण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर त्यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यांकडून टीकाही झाली. तसेच शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरच जल्लोष केला. यानंतर दुपारी पोलीस नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या घरी पोहोचले. त्यांना पोलीस ठाण्यात नेणार होते. पोलीस अधिकाऱ्यांसह पथक घरी गेल्यानंतर राणा दाम्पत्यानं पोलीस ठाण्यात येणार नाही असं स्पष्ट शब्दांत सांगितलं. त्यावर पोलीस अधिकारी त्यांच्याशी चर्चा करत होते. त्याचवेळी नवनीत राणा अचानक भडकल्याचे व्हिडिओमध्ये दिसतं. नियमाला धरून तुम्ही काम करा, तुमचा आवाज खाली करा, आवाज खाली करा. तुम्ही येथून निघून जा, असं त्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोलताना व्हिडिओत पाहायला मिळालं. दुसरीकडे रवी राणा हे देखील कॅमेऱ्यासमोर संवाद साधत होते. आमच्यावर अन्याय होत आहे, हे सर्व जनता बघत आहे, असं रवी राणा बोलत होते.

या सगळ्या घटनेनंतर खासदार नवनीत राणा यांनी व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया दिली. आज ज्या पद्धतीने आमच्या घरात पोलीस जबरदस्ती घुसले. कालपासून आम्ही आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी नोटीस दिली होती. त्यानुसार, आम्ही घराबाहेर पाऊल ठेवले नाही. पण आज पोलीस आमच्या घरात घुसले. पोलीस ठाण्यात आम्हाला नेत आहेत. मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारायचा आहे, ज्या पद्धतीने आम्ही नियमांचे पालन केले, घराबाहेर पाऊल ठेवले नाही. पण आमच्यावर गुन्हा दाखल होत आहे. जबरदस्ती पोलीस आम्हाला पोलीस ठाण्यात नेत आहे. या पद्धतीची गुंडशाही आम्ही आजपर्यंत कधी पाहिली नाही. आमदार आणि खासदारांना जबरदस्ती वाहनात बसवून नेत आहेत. मी देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांना विनंती करते की, आज तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी असताना, आमच्यासारख्यांना अशी वागणूक दिली जात आहे. तुमच्या मदतीची आम्हाला गरज आहे. आमच्यासारख्यांना न्याय मिळू शकत नसेल, तर भविष्यात कुणीही न्यायासाठी लढणारा राहणार नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply