बीड : महावितरणला तहसीलकडून ‘सील’चा शॉक

अंबाजोगाई : महावितरणची सध्या वीज देयक थकबाकी वसुली आणि देयकांच्या थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम जोरात सुरु आहे. सध्या घरगुती, उद्योग आणि शासकीय कार्यालयांत मोहीम राबवीत वीज तोडणाऱ्या महावितरणलाही शुक्रवारी (ता. २५) अंबाजोगाईत महसूल विभागाने थेट कार्यालयच सील करून शॉक दिला.

महावितरणच्या पथकाने येथील तहसील आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयांकडील पाच लाख रुपयांच्या वीज देयकाच्या थकबाकी वसूलीसाठी दोन्ही कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित केला. मग, महसूल विभागानेही ६९ लाखांचा अकृषीक कर थकल्याने अंबाजोगाई येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाला सील ठोकले. महावितरणलाही असा ‘ठोशास ठोसा’ मिळाल्याने या कुरघोडीची चर्चा शहरात चांगलीच रंगली.

मार्च अखेरमुळे सध्या शासनाच्या विविध विभागांचा कर वसुलीवर जोर आहे. तर, महावितरणचीही जिल्हाभरात वीज देयक थकबाकी वसुली मोहीम सुरु आहे. चार दिवसांपूर्वी महावितरणचे संचालक डॉ. नरेश गित्ते यांच्यासह मुख्य अभियंता सुंदर लटपटे व अधीक्षक अभियंता रवींद्र कोलप यांच्या उपस्थितीत बीड शहरात अशी मोहीम राबविण्यात आली.

अगदी जिल्हा परिषदेकडील थकबाकीपोटी नव्या इमारतीचा वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आल्यानंतर मग रात्री उशिरा जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांच्याकडील लाखो रुपयांची थकबाकी धावाधाव करून भरली आणि कारवाई टाळली. परंतु, एकूणच या मोहिमेत महावितरण कंपनीकडून विविध शासकीय कार्यालयांचा वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. बीड शहरही मागच्या काळात सहा महिन्यांहून अधिक काळ अंधारात होते. दरम्यान, महावितरणचे वीजबिलापोटी अंबाजोगाई तहसील कार्यालयाकडे तीन लाख ९४ हजार रुपये तर उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे ८५ हजार रुपये थकले होते.

यापैकी एक लाख ३७ हजारांच्या रकमेचा धनादेश दोनच दिवसांपूर्वीच महावितरणला देण्यात आला होता. तरीदेखील मोठी रक्कम थकीत असल्याने बड्या अधिकाऱ्यांच्या आदेशाने महावितरणच्या वसुली पथकाने शुक्रवारी तहसील आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयासह तहसीलदारांच्या निवासस्थानाचा विद्युत पुरवठा तोडला. यामुळे शुक्रवारी दिवसभर या दोन्ही कार्यालयातील कामकाज विजेअभावी ठप्प होते. मग, महसूल विभागानेही ‘हम भी कुछ कम नही’ असे दाखवून देत महावितरण कंपनीला झटका दिला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply