पुण्यात करोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ; जिल्हा प्रशासनाकडून करोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना

गेल्या काही महिन्यांपासून पुण्यासह महाराष्ट्रात करोना विषाणूची साथ आटोक्यात आली होती. करोना रुग्णांचा आलेख देखील घसरला होता. पण आता पुन्हा एकदा पुणे, मुंबईसह राज्यातील इतर काही जिल्ह्यांत करोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं त्या दृष्टीने राज्य शासनाच्या सूचनेनुसार खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने करोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. एकेठिकाणी तीन ते सात करोनाबाधित रुग्ण आढळल्यास त्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण (जीनोम सिक्वेन्सिंग) करावं. त्यासाठी करोनाबाधितांचे नमुने बै. जी. वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवण्यात यावेत, असं सांगण्यात आलं आहे. सध्या जिल्ह्यातील दाखल रुग्ण आणि गंभीर रुग्णांची संख्या कमी असली, तरी त्यामध्ये वाढ होत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची नुकतीच बैठक घेतली. त्यावेळी करोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेचे प्रशासक आयुष प्रसाद यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांची पहिली आणि दुसरी मात्रा येत्या सात दिवसांच्या आत पूर्ण करावी. त्यासाठी शाळांमध्ये लसीकरण सत्राचं आयोजन करावं. तसेच १४ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण येत्या सात दिवसांत पूर्ण करावं, अशा सूचनाही राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply