पुणे : पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीतील मुलाखती होणार मे महिन्यात

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पीएच. डी. अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरी अंतर्गत विद्यार्थ्यांच्या मुलाखतीची प्रक्रिया ३ ते ३१ मे दरम्यान होणार आहे. पहिल्या प्रवेश फेरीत अपात्र ठरलेले, अनुपस्थित राहिलेले विद्यार्थी देखील पीएच. डी. प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत सहभागी होऊ शकणार आहेत. काही दिवसांपासून रखडलेल्या पीएच.डी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने प्रसिद्ध केले आहे.

पहिल्या फेरीतील पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी भरलेल्या जागा विचारात घेऊन उर्वरित रिक्त जागा भरण्यासाठी तसेच नव्याने मिळालेल्या मान्यताप्राप्त पीएच. डी. मार्गदर्शकांना व पदोन्नतीने प्रवेशासाठी वाढलेल्या अधिकच्या जागा भरण्यासाठी दुसऱ्या प्रवेश फेरीचे आयोजन करण्यात येत आहे. यात पीएच.डी पदवीपूर्व परीक्षेत सवलत मिळालेले पात्र विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना २३ एप्रिल रोजी विद्यापीठ आणि संलग्नित संशोधन केंद्रावरील पीएच.डी.च्या दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगिनमधून ऑनलाइन पद्धतीने विषयनिहाय, प्रवर्गनिहाय उपलब्ध जागांचा विचार करून ३० एप्रिलपर्यंत आवश्यकतेनुसार संशोधन केंद्र बदलण्याची कार्यवाही करायची आहे. केंद्र बदलण्याची प्रक्रिया केली नसल्यास प्रथम फेरीसाठी असलेले संशोधन केंद्रच दुसऱ्या फेरीसाठी कायम राहणार आहे. या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकास कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या तारखा

  • मार्गदर्शकांनी रिक्त जागा अद्ययावत करणे : १७ एप्रिलपर्यंत
  • संशोधन केंद्रांनी प्रवर्गनिहाय रिक्त जागांना मान्यता देणे : १८ ते २२ एप्रिल
  • केंद्रनिहाय प्रवर्गनिहाय रिक्त जागांचा तपशील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन उपलब्ध करणे : २३ एप्रिल
  • आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांनी संशोधन केंद्र बदलण्याची प्रक्रिया करणे : २३ ते ३० एप्रिल
  • मुलाखत प्रक्रिया : ३ ते ३१ मे

विद्यार्थ्यांसाठी सूचना

  • प्रथम फेरीस अपात्र ठरलेले, अनुपस्थित राहिलेले, तसेच पेट एक्झमटेड पात्र विद्यार्थी दुसऱ्या फेरीत सहभागी होऊ शकतात.
  • विद्यार्थ्यांनी निवडलेल्या संशोधन केंद्रांच्या संपर्कात राहावे.
  • दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ‘पीएच.डी. ॲडमिशन २०२१’ या टॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.
  • विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगिनमधून ऑनलाइन पद्धतीने विषयनिहाय प्रवर्गनिहाय उपलब्ध जागांचा विचार करून ३० एप्रिलपर्यंत आवश्यकतेनुसार संशोधन केंद्र बदलण्याची कार्यवाही करावी.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply