पुणे : खड्डे दुरुस्तीसाठी २२१ कोटींची उधळपट्टी, तरीही रस्त्यांची दुरवस्था कायम, आता ४०० कोटींची आवश्यकता

पुणे : रस्ते दुरुस्तीसाठी गेल्या दहा वर्षांत महापालिकेच्या पथ विभागाने तब्बल २२१ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची दुरवस्था आणि रस्त्यांवर खड्डे कायम असल्याने हा खर्च उधळपट्टी ठरला आहे. विशेष म्हणजे, शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने रस्ते दुरुस्तीसाठी किमान चारशे कोटींचा निधी आवश्यक असल्याचा दावा महापालिकेच्या पथ विभागाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे, खर्च वारेमाप आणि खड्डे कायम असेच चित्र शहरात पुन्हा पाहावयास मिळणार आहे.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने रस्ते दुरुस्ती, डांबरीकरणाची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी उपलब्ध करून दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून रस्ते दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असला, तरी रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे, दरवर्षी शेकडो कोटी रुपये खर्च केल्यानंतरही रस्ते योग्य पद्धतीने दुरुस्त का होत नाहीत? अशी विचारणा नागरिकांकडून करण्यात येत असून, महापालिकेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

महापालिकेला गेल्या काही वर्षात रस्ते दुरुस्तीसाठी ३४१ कोटींचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती महापालिकेच्या पथ विभागाकडून देण्यात आली आहे. उपलब्ध तरतुदीपैकी केवळ ६४.८१ टक्के निधीचा प्रत्यक्ष वापर रस्ते दुरुस्तीवर झाला आहे. सन २०१६-१७ या वर्षात सर्वाधिक ७३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यातील ४९ कोटी रुपये रस्ते दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आले. त्यातील ३८ कोटी रुपये पाणीपुरवठा, मलनिस्सारण, गॅस आणि महावितरणाच्या वाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात आलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी खर्च करण्यात आले.

दोन वर्षांपूर्वी करोना संसर्गाच्या कालावधीतील दोन आर्थिक वर्षातही ८६ कोटींच्या एकूण तरतुदीपैकी ६० कोटींचा खर्च करण्यात आला. त्यानंतरही रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट राहिल्याचे दिसून आले. गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक खर्च करूनही यंदा रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शहरातील स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी आणि वाहनचालकांनी त्याबाबत महापालिकेच्या पथ विभागाकडे शेकडो तक्रारी नोंदविल्या आहेत.

महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तरतुदीपैकी केवळ दहा टक्के निधी रस्ते पूर्ववत करण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आला आहे. रस्ते सुस्थितीत राहावेत, यासाठी महापालिकेने यंदा ३० प्रमुख रस्त्यांची निवड केली आहे. या रस्त्यांचे पुनरुज्जीवन केले जाणार असून, जड वाहतुकीनंतरही हे रस्ते खराब होणार नाहीत, या दृष्टीने रस्त्यांवर कामे केली जाणार आहेत. येत्या काही दिवसांत या ३० रस्त्यांवरील कामे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पथ विभागाकडून देण्यात आली.

शहरातील रस्त्यांची एकूण लांबी १ हजार ४०० किलोमीटर आहे. रस्ते दुरुस्तीसाठी दरवर्षी किमान ४०० कोटींची आवश्यकता असते. देखभाल दुरुस्ती दायित्व कालावधीत केलेले रस्ते वगळता अन्य रस्त्यांसाठी हा निधी खर्च केला जातो. मात्र, निधीच्या कमतरतेमुळे रस्ते दुरुस्ती अडचणीची ठरत आहे, असा दावाही महापालिकेच्या पथ विभागाकडून करण्यात आला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply