पुणे : अतिक्रमणांवर पुणे महापालिकेकडून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

पुणे गेल्या महिन्याभरापासून महापालिकेकडून अतिक्रमणांवर जोरदार कारवाई सुरू असताना, बुधवारी (ता. २०) आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यानची नदीपात्रालगतचे हॉटेल, मंगल कार्यालय, गॅरेजसह इतर अनधिकृत बांधकामावर  बुलडोझर चढविण्यात आला. सकाळी साडेसात वाजता महापालिकेने ही कारवाई सुरू करून दुपारी एकपर्यंत ६८ अतिक्रमण पाडून नदीलगतची हरित पट्ट्यातील व निळ्या पूररेषेतील तब्बल चार लाख चौरस फूट जागा मोकळी केली.

महापालिकेवर प्रशासक आल्यानंतर शहरातील अतिक्रमणे, फ्रंट व साइड मार्जिनमधील बांधकाम, शेड यावर अतिक्रमण व बांधकाम विभागाकडून संयुक्त कारवाई केली जात आहे. महापालिकेच्या कारवाईत व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने खराडी भागात पथकावर हल्लादेखील झाला, त्यानंतरच महापालिकेने कारवाई अधिक कडक केली आहे.

म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यान सुमारे अडीच किलोमीटरच्या रस्त्यावर नदीपात्राच्या बाजूने हरित पट्टा असून, निळी पूररेषा आहे, त्यामुळे तेथे बांधकाम करता येत नाही. पण, या रस्त्याच्या बाजूने अनेक मंगल कार्यालय आहेत. गेल्या काही वर्षांत या रस्त्यावर विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची हॉटेल सुरू झाली आहेत. त्यामुळे संध्याकाळनंतर मोठी गर्दी या भागात होते. महापालिकेने यापूर्वी एक-दोन मंगल कार्यालयाच्या अतिक्रमणांवर कारवाई केली. मात्र, सरसकट सर्वच व्यावसायिकांवर कारवाई केली नव्हती. बुधवारी महापालिकेने नोटिसा बजावून पोलिस बंदोबस्तात कारवाई केली.

सकाळी सहापासून महापालिकेने साहित्याची जमवाजमव सुरू केली. साडेसात वाजता कारवाई सुरू होताच, या भागातील व्यावसायिकांची धांदल उडाली. परिसरातील हॉटेल, मंगल कार्यालय चालकांनी राजकीय नेत्यांचा दबाव आणून कारवाई थांबविण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाने त्यास न जुमानता कारवाई केली. जेथे जेसीबी जाऊ शकत नाही, तेथे गॅस कटरचा वापर करून आतमध्ये घुसून शेड तोडण्यात आले. जेसीबीने थेट बांधकाम, पत्र्याच्या शेडवर वार केला जात असल्याने हॉटेल, दुकाने, गॅरेजमधील साहित्याचे नुकसान झाले.

महापालिकेने डीपी रस्त्यावर कारवाई सुरू केलेली असताना, सकाळी म्हात्रे पुलाजवळील एका मंगल कार्यालयात लग्न होते. वधु-वर, नातेवाईक नटून थटून कार्यालयात आले, काही वेळात विधीही सुरू झाले. मात्र, त्याचवेळी महापालिकेच्या जेसीबीने थेट मंगल कार्यालयावर कारवाई सुरू केली. तेथील मांडव पाडण्यात येत असल्याने एकच गोंधळ उडाला. महापालिकेने या मंगल कार्यालयाला नोटीस बजावली होती, पण, त्याकडे दुर्लक्ष करून लग्नाची तारीख घेतली आणि अचानक आज कारवाई झाली. वधू-वराकडील नातेवाइकांनी मंगल कार्यालय चालकाला जाब विचारला. या कारवाईमुळे आनंदावर विरजण पडल्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. अखेर शेजारील एका कार्यालयात हे लग्न पार पडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

कारवाई दृष्टिक्षेपात...

  • सकाळी सहापासून कारवाईसाठी यंत्रणेची जमावजमाव
  • सकाळी साडेसात ते दुपारी दोनपर्यंत कारवाई
  • आठ पथकांमध्ये पोलिस, सुरक्षारक्षक व सेवक, असे ३०० मनुष्यबळ
  • ७६ पैकी ८ मिळकतींवर न्यायालयाकडून कारवाईस स्थगिती
  • ६८ अनधिकृत बांधकाम, शेड जमीनदोस्त
  • २५ वाहने, २० जेसीबी, १२ गॅसकटर, ८ ब्रेकरने कारवाई

अतिक्रमण व बांधकाम विभागाने संयुक्तपणे कारवाई केली आहे. ही कारवाई करण्यापूर्वी ७६ जणांना नोटिसा दिल्या होत्या. त्यातील आठ मिळकतींवर कारवाईस न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे उर्वरित सर्व ६८ बेकायदा मिळकतींवर आठ पथकांच्या माध्यमातून कारवाई केली. याठिकाणी पुन्हा नव्याने अतिक्रमण करू नये. अन्यथा पुन्हा कारवाई केली जाईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply