निर्भया, दामिनी स्काड कुठे आहेत?; पुणे पोलिसांवर चित्रा वाघ यांचे गंभीर आरोप

पुण्यातील शिवसेना नेता रघुनाथ कुचिक याच्यावर बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणातील पीडित मुलगी सध्या बेपत्ता असल्याचा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. पण पुणे पोलीस ती मुलगी तिच्या वडिलांकडे सुखरुप असल्याची खोटी माहिती देत आहेत, असा गंभीर आरोप वाघ यांनी केला आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी त्या आज पुणे दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वाघ म्हणाल्या, अत्याचारानंतर पीडित मुलीला चार रुग्णालयांमध्ये गर्भपातासाठी नेण्यात आलं होतं. त्यातील मंगेशकर आणि हिरेमठ रुग्णालयात तिला नेण्यात आलं होतं या ठिकाणची चौकशी अद्याप बाकी आहे, तिथं पुणे पोलीस अजून गेलेलेच नाहीत. या पीडितेला रुग्णालयात ज्यांनी नेलं त्याचं नाव राहुल गोयल आणि राहुल बोरा असं आहे. राहुल गोयल हा रुबी हॉस्पिटलचा स्टाफ आहे. तर दुसरा राहुल बोरा याचा जबाब अद्याप घेण्यात आलेला नाही. मुलगी अद्याप गायब आहे, १६ तारखेला आरोपी कुचिकवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच या घटनेतील स्पॉट पंचनामे आणि इतर पुरावे सगळं देऊन सुद्धा आवश्यक गतीनं पोलीस या प्रकरणाकडं पाहत नाहीत, त्यांच्याकडून चालढकल सुरु आहे. पोलीस नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? असा सवालही यावेळी चित्रा वाघ यांनी केला. पुणे पोलिसांकडून दिशाभूल करण्याचं काम याप्रकरणी पुणे पोलिसांकडून दिशाभूल करण्याचं काम सुरु आहे. मुलगी वडिलांसोबत नाही, अशी माहिती मला स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पण तरीही महिला आयोगाच्या अध्यक्षा मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत असल्याचं सांगत आहेत. या प्रकरणात योग्य प्रकारे लक्ष न घातला बेताल वक्तव्य केली जात आहेत. मुलगी मिळालेली नाही, तीचे वडील त्यांच्या गावी आहेत. केवळ मुलीचं लोकेशन मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, असंही यावेळी चित्रा वाघ यांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी सत्ताधारी पक्षाचा आहे, त्यामुळं सरकारला हे प्रकरण गांभीर्यानं घ्यायचंच नाहीए का? असा सवालही त्यांनी विचारला. वडगाव शेरीतील शाळेत मुलीवर झाला जीवघेणा हल्ला वडगाव शेरीत एका शाळेत मुलीवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर मला आश्चर्य वाटतंय की, पुण्यात लागोपाठ मुलींवर अत्याचाराचं सत्र सुरु आहे. पण पुण्यात महिलांवरील गुन्ह्याचा आकडा खूपच वाढला आहे. निर्भया, दामिनी स्काड कुठे आहेत? यामध्ये शाळेनं पुढाकार घेणं गरजेचं होतं. माझ्या मुलीला त्रास दिला जातोय असं आम्ही शाळेला सांगितलं होतं, असं तिच्या वडिलांनी सांगूनही शाळेनं योग्य ती खबरदारी घेतली नसल्याबद्दल चित्रा वाघ यांनी खंत व्यक्त केली.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply