एन. रघुरामन यांचा कॉलम:भारतीय महिलांनी घराबाहेर देशातील सर्वात जुनी आर्ट गॅलरी कशी घडवली?

मी माझ्या मूळ गावी जातो तेव्हा कावेरी नदीवर स्नानाला जाताना ‘रांगा-वली’ (रंगांची रेषा या अर्थी संस्कृत शब्द) पाहणे हा माझा आवडता छंद असतो. मला ते दिवस अजूनही आठवतात. प्राथमिक शाळेतील मुली दिवाळीच्या सुट्टीत खडूचे तुकडे गोळा करायच्या. त्यापासून रांगोळीचे रेखाटन बनवण्याचा प्रयत्न करायच्या. त्या रांगोळी काढण्यात तासनतास घालवायच्या. एखाद्याने चुकून त्यावर सायकल चालवली तर त्या खूप रागवायच्या. कारण ती त्यांची कला होती. संस्कृतमध्ये या कलेला ‘भूमि चित्र’ म्हणजे जमिनीवरील चित्रे आणि ‘धूलि चित्र’ म्हणजे पावडरने काढलेली चित्रे म्हणतात. आर्ट गॅलरींमध्ये चित्रांचे प्रदर्शन आणि कौतुक सुरू होण्यापूर्वीच भारताच्या महिलांनी अनेक वर्षांपूर्वीच स्वतःच्या खुल्या गॅलरी बनवल्या होत्या. वयाचे बंधन न मानता त्यांनी हे काम केले. घराचे अंगण आणि उंबरठा हेच त्यांचे कॅनव्हास होते. तांदूळ, हळद, सिंदूर आणि फुलांपासून नैसर्गिक रंग मिळायचे. काही घरांमध्ये महिला धान्याचा भुसा वापरायच्या, जेणेकरून पक्ष्यांना अन्न मिळावे. पिढ्यान््पिढ्या जतन केल्या जाणाऱ्या चित्रांपेक्षा ही कला वेगळी होती. ही चित्रे तर पुसून जाण्यासाठीच तयार केली जायची. संग्रहालयातील एखादे चित्र शतकानुशतके टिकून राहू शकते. पण रांगोळी? पहिले पाऊल पडताच वाऱ्याच्या झुळकेने किंवा पावसाच्या थेंबाने ती मिटून जाते तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी कोणतीतरी महिला ती पुन्हा रेखाटू लागते. या सातत्यामध्ये एक सखोल भारतीयत्व जपलेले आहे. संग्रहालयातील चित्रांच्या उलट रांगोळी ही पारंपरिकपणे सामान्य घरांशी जोडलेली आहे. या कलाकारांना क्वचितच औपचारिक ओळख मिळाली. त्यांचे अंगण हाच कॅनव्हास होता आणि रंग निसर्गाचे होते. घरातील माणसे, वाटसरू, पाहुणे, देव, मुंग्या आणि पक्षी - हे सर्व या कलेचे प्रेक्षक होते. आपण या कलेला ‘रांगोळी’ म्हणतो. पण देशभरात तिची अनेक नावे आहेत. तामिळनाडूमध्ये तिला ‘कोलम’, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये ‘मुग्गू’, बंगालमध्ये ‘अल्पना’, ओडिशामध्ये ‘झोटी’ किंवा ‘चिता’, राजस्थानमध्ये ‘मांडणा’, गुजरातमध्ये ‘साथिया’, उत्तराखंडमध्ये ‘ऐपण’ आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तिला ‘चौक पुराना’ म्हणतात. नावे वेगवेगळी असली तरी त्यामागची भावना एकच आहे - ती म्हणजे समृद्धीचे स्वागत करणे. खास प्रसंगांचा आनंद साजरा करणे. दैनंदिन जीवनात सौंदर्य फुलवण्यासाठी जमीन सजवणे. राजस्थानचे ‘मांडणा’ आपल्या रंगांच्या विरोधाभासासाठी ओळखले जाते. महिला प्रथम गेरूने पार्श्वभूमी तयार करतात. नंतर त्यावर भूमितीय आणि विविध आकृत्यांच्या नक्षी काढतात. उत्तराखंडच्या ‘ऐपण’ मध्येही असाच उठाव दिसतो. तिथे लाल किंवा गेरूच्या पृष्ठभागावर तांदळाच्या पांढऱ्या पिठाने नक्षी सजवली जाते. केरळमध्ये ‘पुक्कलम ‘ची स्वतःची सुंदर परंपरा आहे. ओणमच्या सणात ताज्या फुलांच्या पाकळ्यांनी ‘फ्लॉवर कारपेट’ तयार केले जाते. रांगोळीत गणिताची एक रंजक भाषाही दडली आहे. ‘कोलम’च्या डिझाइनमध्ये सुसंबद्धता, भूमितीय आकार, पुनरावृत्ती आणि ठिपक्यांच्या जाळ्यांचा बारकाईने वापर केला जातो. ‘सिक्कू कोलम’ मध्ये गुंतागुंतीची नक्षी बनवण्यासाठी ठिपक्यांच्या भोवती अखंड जाणाऱ्या रेषा काढल्या जातात. ही रांगोळी काढणाऱ्या स्त्रीकडे मोजपट्टी किंवा कंपास नसतो तरीही वर्षांच्या सरावातून तिला तो समतोल, प्रमाण व भूमिती आपोआप समजते. शतकानुशतके ही परंपरा कशी विकसित झाली? हळूहळू ही कला पवित्र पूजास्थानांमधून बाहेर पडून दैनंदिन जीवनाचा भाग बनली. तीन महत्त्वाच्या बदलांनी या परंपरेला आकार दिला. पहिला बदल, घराचा उंबरठा हे एक पवित्र स्थान बनले. दुसरा बदल, या नक्षी लक्षात ठेवून त्यात सुधारणा करून आणि पुढच्या पिढीकडे सोपवून महिला या परंपरेच्या प्रमुख संरक्षक बनल्या. तिसरा बदल, स्थानिक घटकांनी प्रादेशिक शैलींवर आपला प्रभाव पाडला. आज रांगोळी रंगीबेरंगी पावडर, फुलांची भव्य सजावट, ३डी डिझाइन व सार्वजनिक स्पर्धांपर्यंत पोहोचली तरीही तिचे मूळ आकर्षण तसेच कायम आहे. या कलेला कायम राहण्याची किंवा कौतुकाची कोणतीही अपेक्षा नाही. फंडा असा की- रस्त्याने जाताना तुम्हाला कुठे रांगोळी दिसली तर क्षणभर थांबून त्या कलेचे कौतुक नक्की करा. कारण कदाचित ती त्याच दिवशी मिटून जाणार असते. कारण रोज नव्याने पुन्हा पुन्हा साकारतो तीच कदाचित जगातील सर्वात मोठी कला असते!

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *