एन. रघुरामन यांचा कॉलम:तुमच्या लक्षात आले का, एआय लोकलपासून ग्लोबलपर्यंत सर्वकाही कसे काबीज करत आहे?

काही आधुनिक विद्यापीठांच्या वर्गांमध्ये सध्या एक विचित्र गोष्ट गुपचूप घडत आहे. दुर्गम भागातील एखाद्या गावात बसलेले प्राध्यापक विद्यार्थ्यांना देण्यासाठीच्या असाइनमेंटबाबत एआयचा सल्ला घेतात. ते वर्गात येतात, चांगल्या भाषेत तयार केलेली ही असाइनमेंट विद्यार्थ्यांच्या हाती सोपवतात आणि स्वतःच्या शिक्षणेतर कामांत गुंतून जातात. मोठ्या शहरांतील उदाहरणांनी सजवलेली ही असाइनमेंट विद्यार्थ्यांना क्वचितच समजते. मग तेही त्यांच्या एआयला उत्तरे विचारतात. 50-60 मिनिटांच्या वर्गात दोन्ही बाजू आपापली असाइनमेंट यशस्वीपणे पूर्ण करतात आणि तपासणीसाठी एक नोंदही तयार होते. पण या प्रक्रियेत कुणीही आपल्या तार्किक क्षमतेचा वापर करत नाही. एआयवरील या वाढत्या अवलंबित्वाचा थेट परिणाम नोकऱ्या गमावण्यावर होत आहे. चेन्नईच्या अण्णा विद्यापीठाचेच उदाहरण घ्या. या विद्यापीठाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 498 विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंटशी संबंधित नोकऱ्या मिळवून दिल्या होत्या. पण यंदा नोव्हेंबरपर्यंत केवळ 416 विद्यार्थ्यांनाच प्लेसमेंट मिळू शकले. ही सुमारे 16 टक्क्यांची घट आहे. अनेक विद्यापीठे सध्या अशाच परिस्थितीचा सामना करत आहेत. ही घट का होत आहे? कारण अनेक तरुण आता मित्रांशी सहज गप्पा मारतानाही उत्तरांसाठी एआयवर अवलंबून राहू लागले आहेत. असे केल्याने आपली चांगली छाप पडेल, असे त्यांना वाटते. कॉलेजच्या प्रोजेक्टपासून ते दैनंदिन संवादापर्यंत सर्वकाही एआयच्या हाती सोपवून ते एक मोठा धोका ओढवून घेत आहेत. तज्ज्ञ याला ‘एपिडेमिक ऑफ सेल्फ-मिसट्रस्ट’ म्हणतात. सोप्या शब्दांत सांगायचे तर, त्यांचा स्वतःच्या क्षमतेवरचा आणि निर्णयक्षमतेवरचा विश्वास कमी होत चालला आहे. आत्मविश्वासाची हीच कमतरता नोकरीच्या मुलाखतीतील त्यांच्या कामगिरीवरही परिणाम करत आहे. दुसरीकडे, जी कंपनी पूर्वी सिस्टीम इंजिनिअरिंगच्या कामांसाठी मूलभूत कौशल्ये असलेल्या इंजिनिअरिंग पदवीधरांची निवड करत होती, तीच आता कॅम्पस निवडीमध्ये स्पेशलिस्ट प्रोग्रॅमर आणि डिजिटल स्पेशलिस्ट इंजिनिअर्सवर भर देत आहे. आपल्या क्षेत्राची चांगली जाण असलेला एखादा मेकॅनिकल, सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअर जर एआयचा वापर जाणत असेल, तर तो कॉम्प्युटर सायन्सच्या पदवीधराइतकाच उपयुक्त ठरू शकतो. पक्का पाया, प्रत्यक्ष प्रोजेक्टचा अनुभव आणि इंटर्नशिप केलेले विद्यार्थी कॅम्पस मुलाखतींमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आता केवळ एआय वापरता येणे पुरेसे राहिलेले नाही. आता एआयच्या कहाणीची दुसरी बाजू पाहा. ‘एफव्हीईवाय’ म्हणजेच ‘फाइव्ह आइज’ ही ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, ब्रिटन आणि अमेरिका यांची गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करणारी संघटना आहे. 1946 च्या यूके-यूएसए कराराअंतर्गत तिची स्थापना झाली होती. 2023 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठात झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत या देशांच्या गुप्तचर प्रमुखांनी तंत्रज्ञान कंपन्यांना इशारा दिला होता की, हुकूमशाही सरकारे नवनवीन शोध चोरण्यासाठी टपून बसली आहेत. एमआय 5 चे प्रमुख सर केन मॅक्कलम यांनी सावध केले होते की, ‘जर तुम्ही आज प्रगत तंत्रज्ञानावर काम करत असाल, तर भू-राजकारणाला तुमच्यात रस आहे, मग तुम्हाला त्यात रस असो वा नसो.’ ही गोष्ट आता अधिकच समर्पक ठरते, कारण याच आठवड्यात एनव्हिडियाने राजीनाम्यानंतर अवघ्या 11 दिवसांतच जेन्सेन हुआंग यांना सीईओपदी पुन्हा नियुक्त केले. चिनी गुप्तहेर मानल्या जाणाऱ्या एका महिलेशी असलेल्या संबंधांमुळे हुआंग यांनी राजीनामा दिला होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, खुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हुआंग यांना परत घेण्यासाठी संचालक मंडळावर दबाव आणला आणि त्यांचा उल्लेख ‘महान देशभक्त आणि राष्ट्रीय ठेवा’ असा केला. याच माध्यमांनी याला एक धोकादायक पायंडा म्हटले आहे. या निर्णयामुळे शेअर बाजार खुश आहे, तसेच ट्रम्प आणि गुंतवणूकदारही खुश आहेत. पण वास्तव हे आहे की, एआय हळूहळू शिक्षणापासून ते शेअर बाजार आणि राजकारणापर्यंत आपले हातपाय पसरत आहे. जर तुम्ही एआयवर नियंत्रण मिळवायला शिकलात, तर ते तुम्हाला शक्तिशाली बनवू शकते. अर्थात, चुकीच्या मार्गाने असे घडू नये, असे आमचे मत आहे. फंडा असा आहे की - जर तुम्ही एआयला स्वतःवर नियंत्रण ठेवू दिले, तर सुरुवातीच्या स्तरावरील नोकरी मिळवणेही कठीण होऊ शकते. कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणांसाठी धडा स्पष्ट आहे-केवळ एआयचे वापरकर्ते बनू नका, तर त्याच्या वापरात इतके कुशल व्हा की तुम्ही त्यालाच प्रश्न विचारू शकाल आणि त्याच्या पुढे राहू शकाल.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *