लातूरमध्ये खानावळींचा ‘उपवास पॅटर्न’ ; महागाईच्या विरोधात आंदोलनामुळे हजारो विद्यार्थ्यांचे हाल

लातूर : राज्यभरातील वेगवेगळय़ा भागांतून भिन्न आर्थिक स्तरातील विद्यार्थी शिक्षणकेंद्र म्हणून लातूरमध्ये येतात. यांतील बहुतांश विद्यार्थी न्याहारीसह जेवणापर्यंतच्या सर्व आहारगरजांसाठी आपल्या शैक्षणिक संस्थांनजीकच्या खानावळींवर अवलंबून असतात. महागाईमुळे या खानावळींनी मंगळवारी दरवाढ करीत एक दिवसाचा लाक्षणिक बंद केल्याने या विद्यार्थाना सक्तीचा उपवास घडला. त्यामुळे विद्यार्थीही रस्त्यावर आल्यामुळे पोलिसांना मध्यस्ती करावी लागली.

बारावी आणि त्यानंतर वैद्यकीय तसेच अभियांत्रिकीच्या परीक्षेच्या तयारीचे शैक्षणिक केंद्र असणाऱ्या लातूर शहरातील खानावळ चालकांनी महागाई वाढल्याने खानावळीचे दर १ हजार ८०० वरून १ सप्टेंबरपासून २ हजार ४०० रुपये केले. ही महागाईची झळ किती अधिक आहे हे सरकारला कळावे म्हणून त्यांनी खानावळी बंद ठेवत निषेध आंदोलन केले. परिणामी पाच हजार विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आणि तेही रस्त्यावर उतरले, आणि लातूर शहरात दिवसभर गोंधळ निर्माण झाला.

पोलीस यंत्रणेला ही बाब कळली. जिल्हा पोलीस प्रमुखांनी मेसचे प्रमुख आणि विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत चर्चा करून तोडगा काढला. खानावळीचे भाव वाढवायचे असतील तर ते टप्प्याटप्प्याने वाढवा. एकदम सहाशे रुपये भाववाढ करणे विद्यार्थ्यांला परवडणार नाही, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचेही हेच म्हणणे होते. एकाच महिन्यात वाढ होण्यापेक्षा आता २०० रुपये व गरज भासल्यास तुम्ही दिवाळीच्यावेळी भाव वाढवा, असे ठरले. या चर्चेनंतर दुपारपासून मेस सुरू करण्याचा निर्णय मेसच्या संघटनेने घेतला व विद्यार्थ्यांचाही रोष कमी झाला.

खाडगाव परिसरामध्ये सुमारे ३० ते ४० अभ्यासिका व एवढय़ाच खानावळी आहेत. एका खानावळीमध्ये किमान २०० ते २५० विद्यार्थी जेवण घेतात, त्यामुळे पाच हजार विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. 

मे महिन्यात लातूर शहरातील मेसचे भाव हे दरमहा व्यक्तीसाठी १ हजार ८०० रुपये होते, जून महिन्यात ते वाढवून २ हजार रुपये करण्यात आले. मात्र पेट्रोल, डिझेलपासून सर्वच भाव वाढत आहेत, त्यामुळे आम्हाला भाववाढ करणे अपरिहार्य असल्याचे खानावळ मालकांनी सांगितले. त्यांनी खाडगाव मेस असोसिएशन स्थापन करून १ सप्टेंबरपासून खानावळींचे दर २ हजार ४०० रुपये महिना असे केले.

लातूर शहरातील दयानंद महाविद्यालयाच्या परिसरातील खाडगाव रस्त्यावरील सुमारे २५ खानावळी अचानक लाक्षणिक बंदच्या नावाखाली मंगळवारी बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे या खानावळीमध्ये विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली. या विद्यार्थ्यांनी मग रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

लातूर शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सुमारे दहा हजारपेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. तर, अकरावी, बारावी विद्यार्थ्यांची संख्या ही २५ हजारांपेक्षा अधिक आहे. दररोज २५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी मेसमध्ये जेवण घेतात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply